
दोन महिन्यांपासून कोळसाटंचाईचा सामना करणाऱया महानिर्मितीचे टेन्शन अखेर संपले आहे. महानिर्मितीच्या राज्यातील सर्व वीज केंद्रांमध्ये सरासरी सात दिवस पुरेल एवढा म्हणजे 7 लाख 26 हजार मेट्रिक टन एवढा कोळशाचा साठा झाला आहे. तसेच कोळसा कंपन्यांकडून दैनंदिन वापराच्या तुलनेत 20 हजार मेट्रिक टन वाढीव कोळसा पुरवठा होत आहे. त्यामुळे महानिर्मितीला गरजेनुसार पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे.
महानिर्मितीचे राज्यात नाशिक, कोराडी, भुसावळ, परळी, पारस, चंद्रपूर, खापरखेडा ही सात औष्णिक वीज केंद्र असून त्यांची एकूण वीजनिर्मिती क्षमता 9 हजार 250 मेगावॅट आहे. विजेची मागणी लक्षता घेता येथून सरासरी 70 टक्के क्षमतेने म्हणजे साडेपाच हजार मेगावॅट एवढी वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी दररोज सुमारे 1 लाख मेट्रिक टन कोळसा लागतो. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आतिवृष्टीमुळे कोळसा उत्खननावर विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे महानिर्मितीला पुरवला जाणारा कोळसा अर्ध्यावर आला होता. परिणामी महानिर्मितीची औष्णिक प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती साडेतीन-चार हजार मेगावॅटपर्यंत खाली आली होती. तसेच दररोज उपलब्ध होणाऱया कोळशावरच वीजनिर्मिती करावी लागत होती. मात्र ऑक्टोबर अखेरपासून कोळसा पुरवठय़ात मोठी सुधारणा झाली आहे.
महानिर्मितीला सध्या 1 लाख 20 हजार मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा होत आहे. त्यापैकी वेस्टर्न कोलफिल्डकडून जवळपास 60 टक्के म्हणजे 70 हजार मेट्रिक टन एवढा कोळशाचा पुरवठा केला जात आहे. तर महानदी कोलफिल्ड आणि साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडकडून उर्वरित 40 टक्के कोळसा पुरवला जात असल्याचे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे.
वीज केंद्र कोळशाचा साठा
- कोराडी 7 दिवस
- नाशिक 5 दिवस
- भुसावळ 8 दिवस
- परळी 4 दिवस
- पारस 2.5 दिवस
- चंद्रपूर 2 दिवस
- खापरखेडा 7 दिवस


























































