
पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धेत महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी 1 सुवर्ण, 3 रौप्य व 1 कांस्य पदकांची लयलूट केली आहे. नागपूरच्या तन्वी धुर्वेने महाराराष्ट्राच्या सुवर्ण पदकाचे खाते उघडले. तन्वी पाठोपाठ पलाश ठाकुरने पदकांचा डबल धमाका करीत दिवस गाजवला आहे.
ट्राइबल स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. तन्वी धुर्वेने 100 मी. बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण ती १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रूपेरी यशाला गवसणी घातली. पलाश ठाकूरने 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक व 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य पदकाची कामगिरी केली. 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात भक्तीश कुमारे कांस्य पदकाचे यश संपादन केले. खेलो इंडियातील कामगिरीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, क्रीडा आयुक्त शीतल तेली उगले व संघाच्या पथकप्रमुख भाग्यश्री बिले यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. सर्वोत्तम कामगिरीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
कर्नाटक व ओरीसा नंतर सुवर्णपदक जिंकणारी महाराष्ट्राची तन्वी धुर्वे ही पहिलीच खेळाडू ठरली. तीने 1:23.65 सेकंदात शर्यत पूर्ण करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. मध्य प्रदेशच्या सृष्टि वर्माने रौप्य तर छत्तीसगढ़च्या न्यासा पैकराने कांस्यपदकाची कमाई केली.
तन्वीने नुकतीच दहावीच्या परीक्षा दिली असून तीने खेलो इंडियात प्रथमच पदक जिंकले आहे. यशानंतर तन्वी म्हणाली, की “मी गेल्या आठ वर्षांपासून मी सराव करते. माझे वडील, सुखदेव, एक आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू असून माझा भाऊ, सार्थक, वॉटर पोलोमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता आहे . मला माझ्या कुटुंबाकडून प्रेरणा मिळाली आहे..”
मुली पाठोपाठ महाराष्ट्राच्या मुलांनेही पदकाची कामगिरी केली. 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात पलाश ठाकूरने 32.13 सेकंद वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकले. 31.08 सेकंद सर्वोत्तम वेळेत कर्नाटकच्या मणिकांता एलने सुवर्ण पदकाचा पल्ला पार केला. मणिकांताने स्पर्धेत ८ सुवर्ण पदके जिंकाण्याचा पराक्रम केला आहे.






























































