>> तुषार प्रीती देशमुख
घरगुती खाद्यसंस्कृतीचा व्यवसाय ते फूड स्टॉल असा व्यवसाय वाढवत मराठमोळ्या पदार्थांची चव ग्राहकांना देणाऱया खाद्य व्यवसायापैकी एक म्हणजे ओमकार फूड स्टॉल.सुनीता शशिकांत दांडेकर यांना पती निधनानंतर त्यांच्या जागेवर बँकेत नोकरी तर लागली, पण मिळणाऱया पगारात संसार कसा चालवावा? हा सर्वात मोठा प्रश्न त्यांना पडला होता. आलेल्या संकटावर मात करून आपल्या संसाराचा डोलारा यशस्वीरित्या पुढे चालवण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी बनवलेल्या उपम्याची चव अनेकांना आवडत असल्यामुळे तुम्ही नाश्त्याला उपमा बनवून आम्हाला विकत देऊ शकता का? असा प्रश्न त्यांना अनेकांनी विचारला. तेव्हा त्या पहाटे लवकर उठून खाद्यपदार्थ बनवून ते विकून मग नोकरीवर जायच्या.
स्वकष्टाच्या माध्यमातून संकटावर मात करणाऱया आईचा खडतर प्रवास त्यांच्या मुलीने अनुभवला होता. त्यामुळे त्यांच्यावर जेव्हा संकटं आली तेव्हा सुप्रभाताईंनी नोकरी सोडून खाद्य व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यांचे पती संतोष सुर्वे यांची त्यांना मोलाची साथ लाभली. ते एका कपडय़ाच्या दुकानात नोकरी करायचे. आपल्या पत्नीच्या घरगुती खाद्यसंस्कृतीच्या व्यवसायाला मदत करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून दिली आणि पत्नीला मदत करायचे ठरवले. त्या दोघांनी पहिल्यांदा घाटकोपरला एक नाश्ता विक्रीचा छोटासा व्यवसाय चालू केला. बरोबरीने संतोषदादा देवासाठी लागणारे फुलांचे सुबक हारदेखील बनवू लागले.
2004 साली त्यांनी दादर पश्चिम येथील न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे मार्गाच्या सिग्नलजवळ ‘ओमकार कॅटरर्स’ या नावाने नाश्ता विक्री व्यवसायाला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, सकाळी लवकर या परिसरात अनेकांना नाश्त्याची गरज लागते. नोकरीच्या निमित्ताने रात्रीची शिफ्ट केल्यानंतर घरी परतताना अनेकांना भूक लागलेली असते. काहीजण नोकरीला सकाळी लवकर जात असल्याने त्यांना पोटभरीचा नाश्ता आवश्यक असतो. मुलांना
कॉलेजला जाताना पौष्टिक नाश्ता उपलब्ध व्हावा या सगळ्या विचाराने पहाटे 5ः30 ते सकाळी 10.00 पर्यंत त्यांनी पोहे व उपमा विक्रीसाठी ठेवून व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला जेमतेम पाच प्लेट विक्री व्हायची. पण त्यांनी हार मानली नाही. जिद्दीने व चिकाटीने व्यवसाय सुरू ठेवला. नाश्त्याची चव व त्याचा दर्जा लोकांना आवडू लागला. जे कोणी इथे नाश्ता करायला यायचे ते अनेकांना या नाश्त्याची चव सांगू लागले. त्यामुळे त्यांचे गिऱहाईक दुपटीने वाढू लागले. सुप्रभाताईंचा व्यवसाय वाढू लागला. त्यांच्या आई सुनीताताई उपमा, पोहे, बटाटेवडे असे चविष्ट पदार्थ त्यांना विक्रीसाठी देण्यास मदत करू लागल्या. त्यांचे पती संतोषदादा तेथे नेऊन विक्रीसाठी उपलब्ध करू लागले. अशा प्रकारे या नवरा- बायकोची मेहनत यशस्वी होऊ लागली. सुरुवातीला जेमतेम पाच प्लेट विक्री होणारे नाश्त्याचे पदार्थ 50 प्लेटपर्यंत पोहोचले.
शाळेत असताना ओमकार आईच्या या व्यवसायाला मदत करू लागला. बाजारहाट करून देणे, घरी बनवलेल्या पदार्थांचे डबे विक्रीच्या ठिकाणी आणून देण्याचे काम करणे, आजीने व आईने बनवलेले नाश्त्याचे पदार्थ चाखण्याचे महत्त्वाचे कामदेखील तो करायचा. आई-वडिलांचा हा सर्व खडतर प्रवास पाहणाऱया त्यांच्या मुलाने ओमकारने आई-वडिलांना साथ देण्याचे ठरवले. 2010 पासून ओमकारने आपल्या व्यवसायात संपूर्ण लक्ष देऊन व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली. तरुण पिढीला मराठमोळ्या पदार्थांचा नाश्ता खाण्याची ओढ लागावी यासाठी त्याने पोहे, उपमा, सांजा, शिरा, साबुदाणा खिचडी, मिसळ, बटाटा वडा, आंबोळी,
पॅटीस, समोसा अशा सर्व पदार्थांबद्दल खूप चांगल्या पद्धतीने प्रचार केला.
व्यवसायाच्या सुरुवातीला सुप्रभाताई व त्यांच्या आई घरून पदार्थ बनवायचे. संतोषदादा स्टॉलवर विक्री करण्याचे काम करायचे आणि ओमकार त्यांना लागेल तशी मदत करायचा. जेमतेम तीन-चार जणांमध्ये हा व्यवसाय वाढल्यामुळे त्यांची खूप दमछाक व्हायला लागली. ओमकार फूड स्टॉलवर ग्राहकांना मिळत असलेले उत्कृष्ट दर्जाचे नाश्त्याचे पदार्थ व प्रत्येक ग्राहकाला घरगुती नाश्त्याची चविष्ट रुचकर चवीचा आस्वाद घेता येत असल्यामुळे त्यांचा व्यवसाय झपाटय़ाने वाढत होता. वाढत्या व्यवसायाचा व ग्राहकांचा प्रतिसाद बघता त्यांनी आपल्या व्यवसायासाठी मदतनीस ठेवण्याचे ठरवले. सुप्रभाताईंच्या मार्गदर्शनाखाली राकेश जाधव दादा त्यांना नाश्ता बनवण्यासाठी मदत करू लागले. स्टॉल सांभाळण्यासाठी गुरुदास, जगत व समीरदादा यांची साथ मिळाली, तसेच मदतनीस म्हणून रामलालदादा जबाबदारी सांभाळतात. मराठी माणसाने व्यवसाय करावा हे फक्त बोलून चालत नाही, तर मराठी माणूस जेव्हा व्यवसाय करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा त्याला सगळ्यांचं सहकार्य मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. जे ओमकार फूड्स सुर्वे कुटुंबियांना लाभलं हे मात्र ते अभिमानाने सांगतात.
ओमकारच्या सोशल मीडिया प्रमोशनचाही त्याला खूप फायदा होतो. नाश्त्याचे पदार्थ करून ते स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्याचं काम हे आमचं असतं, पण त्याची जाहिरात करताना अनेकांचे हातभार लागतात. ज्यामुळे ग्राहक दुपटीने आमच्या स्टॉलचा पत्ता शोधत शोधत आमच्यापर्यंत पोहोचतात व नाश्त्याचा आस्वाद घेऊन आम्हाला त्यांची प्रतिक्रिया लगेच कळवतात. बायकोने सुरू केलेल्या व्यवसायाला न लाजता संतोषदादांनी खंबीरपणे साथ देऊन व्यवसायाला गगन भरारी घेण्यासाठीचे पाठबळ दिले. नोकरी सोडून व्यवसाय करणं हा निर्णय घेणं खरं तर सोप्पं नव्हतं. मात्र त्यांनी व्यवसायाला आपलंसं करून व्यवसाय हा आपल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. सुर्वे कुटुंबियांसारखी अनेक कुटुंबे लोकांना पोटभरीचा पौष्टिक नाश्ता विक्रीचा व्यवसाय करून आपलं पोट भरण्याचं काम करत असतात. अशा या सर्व व्यावसायिकांना मानाचा मुजरा.