मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा, ‘या’ प्रमुख 8 मुद्द्यांचा समावेश

2713

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थिती, आव्हाने, प्रतिबंधात्मक उपाय, विविध वर्गांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी चर्चा केली.

शरद पवार यांनी मांडलेले मुद्दे –
1) कोविड-19 व लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब लागेल. परिणामी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संख्येत घट होऊन शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान संस्था यांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. आर्थिक तोटा सहन न झाल्यामुळे काही शैक्षणिक संस्था कोलमडतील अथवा बंद पडण्याची देखील शक्यता आहे. एकंदरीत विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांचे नुकसान होऊ नये, शिक्षणात व्यत्यय येऊ नये याकरता वेळीच उपाययोजना करण्यासाठी एक अभ्यास गट अथवा समिती नेमावी.

2) लॉकडाऊनच्या अटी शिथील करून राज्यातील उद्योग सुरू करण्याकडे शासनाने भर दिला आहे. परंतु निर्गमित होणाऱ्या सूचना पुरेशा वाटत नाहीत. राज्य व राज्याबाहेरील कामगार गावी स्थलांतरीत झाले असल्याने कारखाने सुरू होण्याच्या परिस्थितीत नाहीत. ते कसे परततील याचे नियोजन करावयास हवे.

3) महाराष्ट्रातील नव्या बेरोजगार पिढीला, मराठी माणसाला रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यांना उद्योग क्षेत्रात कसे सामावून घेण्यात येईल याचा कृती कार्यक्रम आखावा लागेल.

Covid 19 विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक, उद्धव ठाकरे-ममता बॅनर्जी यांच्यासह 15 पक्षांतील नेते राहणार उपस्थित

4) पूर्वी मागास, अविकसीत भागात उद्योगांना प्रोत्साहन योजना राबवल्या जात. त्या धर्तीवर राज्यात नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, उद्योग वाढीसाठी नवीन सवलतींचे प्रोत्साहनपर धोरण आणणे आवश्यक वाटते.

5) लॉकडाऊनच्या काही अटी शिथील करून राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणावी लागेल. याकरता दररोज ठराविक वेळ निश्चित करून शासनामार्फत आवश्यक सवलतींची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी. दुकाने, कार्यालये, खासगी क्षेत्रातील आस्थापने टप्प्याटप्प्याने उघडली जातील याकडे


पहावे.

6) सरकारी व खासगी बंदरांतील कामाचा वेग काहीसा थंडावला असल्याचे जाणवते. आयात, निर्यात व देशांतर्गत जलवाहतूक वाढवण्याकरता त्या क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजक व तज्ज्ञ अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करावी.

7) राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा जनतेत विश्वास निर्माण व्हावा म्हणून राज्याचे मंत्री आणि अधिकारी यांची उपस्थिती वाढणे आवश्यक आहे. मंत्री व अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी योग्य त्या सूचना निर्गमित व्हाव्यात.

8) लॉकडाऊनमुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. आपण राज्यांतर्गत रस्ते वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आणण्याकरता योग्य ती पाऊले उचलावीत तसेच विमान व रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा.

कोरोना हा आजार इतक्या लवकर हद्दपार होणार नाही. त्यामुळे कोरोना हा जीवनाचा एक भाग समजून, त्याच्यापासून सावध राहून, आरोग्य सांभाळण्याबाबत जनतेमध्ये व्यापक जागृती घडवणे आवश्यक आहे. जपानमध्ये संसर्ग नसतानाही लोक दैनंदिन जीवनात मास्क घालणे, वैयक्तिक स्वच्छता वगैरे पथ्ये पाळतात असेही शरद पवार यांनी यादरम्यान म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या