रत्नागिरीत यंदा ‘महासदाशिवा’चं आकर्षण, गणरायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी

586
mahasadashiva-ganesh

गेली 44 वर्षे माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या रत्नागिरीतील मारुती कॉमन क्लबची यंदाची श्री गणेशाची मूर्ती अत्यंत वेगळी आणि पुराणामध्ये स्वतःचे महत्त्व जपणारी अशी आहे. ‘महासदाशिव’ असे हे श्री गणेशाचे रूप रत्नागिरीतील प्रसिद्ध मूर्तीकार सुशील कोतवडेकर यांच्या हस्तकौशल्यातून साकारली आहे.

मारुती कॉमन क्लब ही संस्था रत्नागिरीतील एक नावाजलेली संस्था असून विविध उपक्रम साजरे करत असते. माघी गणेशोत्सवाचे त्यांचे यंदाचे 44 वे वर्ष आहे. क्लबच्या उत्सवात असलेली श्रींची मूर्ती अत्यंत वेगळी आणि चित्ताकर्षक आहे. 25 मुखं आणि 50 हात असलेली ही ‘श्रीं’ची मूर्ती पाहताक्षणी आपल्या मनात अनेकविध प्रश्‍न उपस्थित करते.

मंडळाने दिलेल्या माहितीनुसार ही मूळ ‘महासदाशिवा’ ची मूर्ती आहे. भगवान शंकर कैलास पर्वतात वसलेले असून त्यांना 25 मुखं आणि 50 हात आहेत. म्हणून त्यांना ‘महासदाशिव’ म्हणतात. त्याचबरोबर आजूबाजूला कैलास पर्वतामध्ये अजून निरनिराळ्या 25 मूर्ती आहेत. रुथरास, सिद्धास, साजे हे तिघे त्या महासदाशिव मूर्तीची पूजा करतात.

पुराणातून असे समजते की, हा 25 मुखी सदाशिव कैलासात आहे. ते आपला आशीर्वाद सगळ्या जीवांना दानाच्या स्वरूपात देतात, म्हणून त्यांना अनुग्रह मूर्ती असेही म्हणतात. अजूनही या मूर्तीचा आकार-उकार समजला नाही. मूर्तीचे शरीर अनेक प्रकार एकत्र येऊन तयार झाले आहे. कांचीपूरममध्ये या महासदाशिवाची पूजा केली जाते. या महासदाशिवाची मूर्ती कोणत्याही मंदिरात नसून ती तामिळनाडू राज्यातील जिल्हा कन्याकुमारी येथील सुचिंद्रम पंचायत शहरातील सुरांगरेश्‍वर या मंदिराच्या गोपुरावर आहे. अशाच अनेक मंदिरांच्या गोपुरावर महासदाशिव आहे.

याची पूजा-अर्चा केली की महासदाशिव प्रसन्न होतात. खूप ताप असल्यावर या महासदाशिवाला ऊसाच्या रसाचा अभिषेक केल्याने ताप कमी होतो, अशी मान्यता आहे.

या 25 मुखी श्री गणेशाचा उत्सव मंगळवार दि. 28 जानेवारीपासून सुरू झाला असून रत्नागिरीतील खालची आळी येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या