वैद्यनाथाच्या नगरीत महाशिवरात्रीची जय्यत तयारी; 5 लाख भाविक येण्याची शक्यता

715

द्वादश ज्योतिर्लिंग मंत्रात “परल्याम् वैद्यनाथंच” असा उल्लेख असणाऱ्या भगवान शंकराच्या देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे असलेल्या श्री वैद्यनाथाच्या पावन भूमीत महाशिवरात्र यात्रा महोत्सव 21 फेब्रुवारी शुक्रवार पासून प्रारंभ होत आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वात वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल होत असतात. भाविकांच्या दर्शनासाठी श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट कडून विशेष सोय करण्यात आली आहे. मंदिराच्या उत्तर पायऱ्यावर बॅरीकेटिंग करण्यात आली असून भव्य मंडपही उभारण्यात आला आहे. शिवरात्रीनिमित्त मंदिराला मनमोहक रंगरंगोटी करून विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.

मंदिर परिसरात 100 वर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी राहणार असून सुरक्षेसाठी 300 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. 21 ते 24 फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे.

असा आहे कार्यक्रम

  • शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 8 दरम्यान वैद्यनाथ देवस्थान कमेटी तर्फे राहुल रेखावार जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून प्रभू वैद्यनाथास रूद्राभिषेक करून शासकीय महापूजा करण्यात येणार आहे. या अभिषेकानंतर भाविकांना आपले अभिषेक करता येतील. या अभिषेकासाठी एका आवर्तनास एकास 100 रूपये तर सपत्नीक अभिषेकाला 150 रूपयाची पावती आकारण्यात आली आहे, असे वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.
  • श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टमार्फत 22 रोजी रोजी परिसरातील सर्व शिव भक्तांना दर्शन मंडप येथे महाप्रसाचे वाटप दुपारी 12 ते 4 या वेळेदरम्यान करण्यात येणार आहे.
  • 23 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री वैद्यनाथाची पालखी सवाद्य मिरवणुकीसह निघणार असून सायंकाळी 6 वा.देशमुख पार येथे सुप्रसिध्द गायक पंडित धनंजय म्हसकर व प्राजक्ता काकतकर मुंबई यांचा भक्तीगीत व अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी अंबवेस येथे रात्री 9 वाजता शोभेचे दारु उडविण्यात येईल. त्यानंतर गणेशपार, नांदुरवेस, गोपनपाळे गल्ली येथे कलावंताची हजेरी होईल. पुढे अंबवेस,भोईगल्ली मार्गे रात्री मिरवणुकीने पालखी मंदिरात परत येईल.
  • 24 सोमवार रोजी सकाळी 10 ते 1 वैद्यनाथ मंदिरात मानाची बिदागी वाटपाचा कार्यक्रम असे महाशिवरात्र उत्सवाचे स्वरूप असणार आहे.

parli-vaijnath

दरम्यान, देवस्थान ट्रस्टकडून परळीकरांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे,यासाठी त्यांना आपले आधार किंवा निवडणूक ओळखपत्र दाखवून 21 रोजी रात्री 10 पासून पासच्या रांगेत विनामूल्य दर्शन घेता येणार आहे.पुरूष व महिलांच्या दोन वेगळ्या रांगा असतील तर पासधारकांची वेगळी रांग असणार आहेत यासाठी 100 शुल्क आकारले गेले आहे, अशी माहिती श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली आहे.

parli

आपली प्रतिक्रिया द्या