महात्मा गांधी यांचे संकलित वाड्यमय ई-स्वरुपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाच्या दर्शनिका (गॅझेटिअर) विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘महात्मा गांधी संकलित वाड्मय भाग- 1’ चे 1 ते 50 खंड आता ई – स्वरुपात (पेनड्राईव्ह) उपलब्ध होणार आहेत. खंडांमध्ये महात्मा गांधी यांचे स्फूर्तिदायी जीवन, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, त्यांचे कार्य, भाषणे, लेख व पत्रसंग्रह अशा विपुल साहित्याचा समावेश आहे.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ई-स्वरुपातील प्रकाशन होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्या ऑनलाईन प्रकाशन होईल. संशोधक, साहित्यिक, विद्यार्थी यांच्यासाठी हा बहुमोल साहित्य ठेवा असल्याचे दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांनी सांगितले.

महात्मा गांधींच्या समग्र वाड्मयाचे प्रकाशन इंग्रजी आणि हिंदी या भाषांतून करण्याची योजना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राबवली होती. या वाडमयाचे मराठी रुपांतर करण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियर विभागाने केले. एकूण 1 ते 98 खंडापैकी भाग 1 ( खंड 1 ते 50) ई – स्वरूपात येत आहेत.