उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरतेच्या लुटीवर अजब इतिहास सांगितल्याने सर्वांनीच तोंडात बोटे घातली आहेत. या विधानावरून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. फडणवीसांना नेटकऱ्यांनी अक्षरशः फोडून काढले. महाविकास आघाडीनेही फडणवीसांच्या विधानावर सडकून टीका केली. फडणवीसांनी महाराजांच्या शौर्यावर आक्षेप घेतला आहे, हा अक्षम्य गुन्हा आहे, अशी तोफ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून डागण्यात आली.
फडणवीसांनी महाराजांचा अवमान केला
शिवरायांनी सुरत लुटली असे बखरींमध्ये लिहून ठेवलेय. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही असे विधान करून फडणवीसांनी महाराजांच्या शौर्यावर आक्षेप घेतला आहे, हा अक्षम्य गुन्हा आहे, असे म्हणत फडणवीस साहेब, महाराजांचा अवमान का केलात, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
…किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर
“वाटलं होतं जरा विश्रांती घ्यावी… पण इतिहास पुनः पुन्हा मांडावाच लागणार…’’, “ मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर’’ या बहिणाबाईंच्या ओळी इतिहास बदलू पाहणाऱ्यांनासुद्धा लागू होतील अस वाटलं नव्हतं,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यात नमूद केले आहे.
फडणवीस फेक नरेटिव्ह पसरवत आहेत…
पंडित नेहरू यांनी त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवरायांबद्दल आक्षेपार्ह लिहिलेय, त्यासंदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना उद्देशून केला होता. त्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शिवरायांच्या अवमानाविरोधातील जोडे मारा आंदोलनाला शिवद्रोही व्यवस्थेने परवानगी नाकारली आणि आता काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह देवेंद्र फडणवीस व भाजपा पसरवत आहे. फेक नॅरेटिव्ह पसरवणे हा भाजपाचा डिएनए आहे, असेही पटोले म्हणाले.