
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने विधानसभेत बहुमताची चाचणी पार केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 169 आमदारांनी समर्थन प्रस्ताव दिला.
शनिवारी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी प्रभारी सदस्यांना प्रस्ताव मांडण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुप्त मतदानाऐवजी उघड मतदान घेत असल्याचंही हंगामी अध्यक्षांनी जाहीर केले. बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला शिवसेनेचे सुनील प्रभू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर प्रस्ताव पारीत करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर सभागृह पूर्ण विश्वास व्यक्त करत असल्याचा प्रस्ताव काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मांडला. त्यानंतर प्रभारी सदस्यांना प्रस्ताव मांडण्याचे हंगामी अध्यक्षांनी आदेश दिले. या प्रस्तावापर्यंत विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. अखेर विरोधकांनी सभात्यागही केला.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिरगणती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या बाजूने 169 मते पडली आणि महाविकास आघाडीने ही बहुमताची चाचणी पार करत मोठं बहुमत सिद्ध केलं.






























































