वीज उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना येणार अच्छे दिन

432

देशातील सर्वात मोठी वीज कंपनी असलेल्या महावितरणची राज्यभरात शेकडो वीज उपकेंद्रे आहेत. तेथे काम करणाऱया वीज कर्मचाऱ्यांना ना टेबल, ना खुर्च्या. तसेच कंपनीचे साहित्य, रेकॉर्ड ठेवण्यासाठी कपाटही नाहीत. त्यामुळे कर्मचाऱयांची मोठी गैरसोय होते. त्याची दखल घेत प्रत्येक उपकेंद्राला गरजेनुसार टेबल, खुर्च्या, कपाट पुरवण्याचे निर्देश प्रशासनाने स्थापत्य विभागाला दिले आहेत.

महावितरणचे राज्यभरात सुमारे अडीच कोटी वीज ग्राहक आहेत. महापारेषणने वाहून आणलेली वीज ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे काम 33 केव्हीच्या वीज उपकेंद्राच्या माध्यमातून केले जाते. वीज वितरणच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा विभाग आतापर्यंत दुर्लक्षितच होता. कर्मचाऱयांना कामाच्या ठिकाणी टेबल, खुर्च्या, कपाटाशिवाय पाणी, शौचालय आदी सुविधांचीही वानवा आहे. याबाबत कर्मचाऱयांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून कर्मचाऱयांना कोणत्या सुविधांची कमतरता आहे त्याचा आढावा घेऊन तत्काळ सदर सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबरच सुरक्षेच्या कारणास्तव उपकेंद्रात अग्निशमक उपकरणे ठेवणे बंधनकारक केले आहे.

यंत्रचालकांच्या निवासाची व्यवस्था करणार

वीज उपकेंद्रात 24 तास डय़ुटी असते. त्यामुळे यंत्रचालकांना रात्री-अपरात्री डय़ुटीवरून घरी जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक शाखा कार्यालय व उपकेंद्रात लाइनस्टाफ व यंत्रचालकांसाठी स्वतंत्र लॉकरची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या