महावितरणच्या थंड कारभाराचा फटका, निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही 327 अभियंते बेरोजगारच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणच्या थंड कारभाराचा मोठा फटका राज्यातील 327 बेरोजगार अभियंत्यांना बसला आहे. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रीक) या पदासाठी महावितरणने 13 नोव्हेंबर 2019 रोजी लेखी परीक्षा झाली असून जानेवारीमध्ये निवड यादी जाहीर झाली आहे. तसेच उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननीही झाली आहे. त्यास सहा महिने उलटल्यानंतरही महावितरणने संबंधितांना नियुक्ती पत्र दिलेले नाही. त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही सदर अभियंते आजही बेरोजगारच आहेत.

महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंत्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी महावितरणने जून 2019 मध्ये जाहिरात काढली होती त्यानुसार नोव्हेंबरमध्ये लेखी परीक्षा झाली असून निवड यादी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी फेब्रुकारीच्या पहिल्या आठवडय़ात झाली आहे. त्यानंतर उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र देऊन कामावर रुजू करून घेणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने नियुक्ती पत्र देण्याबाबत वेळ काढुपणा अवलंबल्याने उमेदकार नाराजी व्यक्त करत आहेत.

महावितरणसोबतच मुंबई महापालिका आणि मुंबई मेट्रोने विविध पदांसाठी जाहिरात काढली होती. लॉकडाऊन असतानाही उमेदवारांना नियुक्ती पत्र देऊन कामावर रुजू करून घेतले आहे.