
सामना ऑनलाईन । पिंपरी
‘निवडणूक प्रचार, ‘आदित्य संवाद’ यासाठी मी महाराष्ट्रभर फिरतोय. सगळीकडेच मला भगव्याचे वातावरण आणि भगवा रंगच दिसतोय. ‘धनुष्यबाण’ आणि ‘कमळ’ ही दोनच चिन्हे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचा विजय निश्चित आहे. राज्यात महायुतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील,’ असा विश्वास शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
शिवसेना-भाजप महायुतीच्या शिलेदारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘राज्यातील राजकीय वातावरण महायुतीच्या बाजूने आहे. विरोधक असलेल्या काँगेस-राष्ट्रवादीकडे प्रचाराचे मुद्देच नाहीत. त्यांच्यासोबत असलेले मित्रपक्ष जम्मू-कश्मीरमध्ये 370 कलम तसेच ठेवणार असल्याचे सांगत आहेत. त्यांची सत्ता आली तर अजून एक पंतप्रधान देशाला मिळेल. मात्र, लोकांना देशाची फाळणी नको आहे. त्यामुळे मतदारांना शिवसेना-भाजप महायुतीलाच विजयी करायचे आहे. आम्ही जे विषय हाती घेतले आहेत, त्याबाबत मी बोलत आहे, विरोधकांबाबत नाही. राज्यात महायुतीचे सर्वाधिक उमेदवार विजयी होतील, याची मला खात्री आहे,’ असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
महायुतीचे मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री विद्या ठाकूर, राज्यमंत्री रवींद्र वायकर, विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, विभागप्रमुख- आमदार सुनील प्रभू, विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस, भाजप आमदार, जिल्हाध्यक्ष अमित साटम, रिपाइं (ए) चे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव उपस्थित होते.
शिवसेना-भाजप महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी भाजप नेते गिरीश बापट, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, राज्यंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे यांनी मिरवणूक काढली.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी आपला अर्ज डोंबिवली क्रीडा संकुलातील निवडणूक कार्यालयात सादर केला. त्यापूर्वी अंबरनाथ ते कल्याणदरम्यान तुफान गर्दीची विक्रमी भगवी रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजन विचारे, भिवंडीतील उमेदवार कपिल पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे, भाजपचे विस्तारक शशिकांत कांबळे, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, आमदार रवींद्र फाटक, सुभाष भोईर, किसन कथोरे, डॉ. बालाजी किणीकर सहभागी झाले.

























































