महायुती सरकारच्या अत्याचारी व भ्रष्ट कारभाराला उघड करणाऱ्या पोलखोल रथाचे उद्घाटन महाविकास आघाडीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे केले. हा पोलखोल रथ विविध मतदार संघात जाऊन भाजप महायुती सरकारने दोन वर्षात केलेल्या भ्रष्ट कारभाराची माहिती जनतेपर्यंत पोहचवणार आहे.
“अदानी सरकारने भ्रष्टाचार आणि अन्यायाचा कळस गाठला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राला लुटण्याची एकही संधी सोडली नाही. इथले उद्योग आणि रोजगार पळवले, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले त्याकडे सरकारने लक्ष दिले नाही, पण लाडक्या मित्रासाठी मुंबईकरांच्या हक्काच्या जमिनी बळकावल्या, प्रत्येक कंत्राटमध्ये कमिशनखोरी केली. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात देखील भ्रष्टाचार केला. महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहोचवली. आता महाराष्ट्राची स्वाभीमानी जनता या शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही भाजप युतीला घराचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार येईल”, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, मुंबई प्रभारी यू.व्ही.वेंकटेश, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आ.अमिन पटेल, प्रनिल नायर, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, सुरेशचंद्र राजहंस, संदीप शुक्ला, तुषार गायकवाड, कचरु यादव, अजंता यादव, अवनिश सिंग, अशोक गर्ग, उपस्थित होते.