‘कॅप्टन कूल’ होणार धोनीचा ब्रॅण्ड, ट्रेडमार्क नोंदणीसाठी केलेला अर्ज स्वीकृत

क्रिकेटविश्वात कॅप्टन कूल टोपण नावाने प्रसिद्ध आलेल्या माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आता या नावाने ब्रॅण्ड करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी त्याने दोन वर्षांपूर्वीच कॅप्टन कूल नावाचे ट्रेडमार्क नोंदणीसाठी अर्ज केला होता. आता हा नोंदणी अर्ज स्वीकारण्यात आला असून तो मंजुरी प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. लवकरच या नावाच्या ट्रेडमार्कवर धोनीला हक्क प्राप्त होईल.

क्रिकेटमध्ये परिस्थिती कितीही अटीतटीची किंवा दबावाची असो, सामना कितीही रोमहर्षक स्थितीत असो किंवा मैदानाबाहेरील वातावरण कितीही तापलेले असो, धोनी हा नेहमीच या आव्हानांना अत्यंत शांत राहून सामोरा जातो. म्हणूनच नेहमीच डोक्यावर बर्फ घेऊन प्रत्युत्तर देणाऱया धोनीला अवघे विश्व कॅप्टन कूल म्हणूनच ओळखतात. हीच त्याची ओळख बनली होती. आपल्या याच ओळखीला त्याने ट्रेडमार्क बनविण्याची शक्कल लढवली आणि 5 जून 2023 ला कॅप्टन कूल या ट्रेडमार्कच्या नोंदणीसाठी अर्ज केला होता. आता या नावाला कुणाचा विरोध किंवा आक्षेप असेल तर त्यांनी समोर यावे, अशी प्रक्रिया सुरू आहे. या नावाला कुणाचा आक्षेप किंवा विरोध नसल्यामुळे हे नाव धोनीलाच मिळणार असल्याचेही जवळजवळ निश्चित आहे.

रिथी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही पंपनी धोनी संबंधित आहे आणि त्याचे कॅप्टन कूल हे ट्रेडमार्क या खेळाच्या वस्तूंचे ब्रॅण्डिंग करण्याच्या दृष्टीने वापरले जाणार आहे. ट्रेडमार्क नोंदणी झाल्यानंतर हे नाव ब्रॅण्डसाठी संरक्षित होते आणि त्याचा वापर अन्य कुणीही करू शकत नाही. तसेच कुणी या नावाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तसेच नुकसानभरपाईचा दावासुद्धा केला जाऊ शकतो. म्हणूनच अनेक खेळाडू तसेच अनेक कंपन्या आपल्या वस्तूंचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी ट्रेडमार्कची नोंदणी करतात आणि त्याची जगभर ब्रॅण्डिंग करतात. धोनी कॅप्टन कूल या नावाचा वापर नक्की कोणत्या उत्पादनासाठी करणार आहे, हे येत्या काळात जगासमोर असेलच.

चार वर्षांपूर्वी केला होता अर्ज

जुलै 2021 मध्ये प्रभा स्किल स्पोर्ट्स प्रायव्हेट लि. या संस्थेनेही कॅप्टन कूल या नावासाठी अर्ज केला होता, मात्र त्यांचा नोंदणी अर्ज अद्यापही सुधारणेच्या स्थितीत असल्यामुळे धोनीच्या अर्जाचा मार्ग मोकळा झाला आहे.

जगभरातील दिग्गज क्रीडापटूंचे ट्रेडमार्क

धोनीच्या आधीही अनेक दिग्गज क्रीडापटूंनी आपल्या ट्रेडमार्कची नोंदणी करून आपल्या उत्पादनांची विक्री केली आहे. यात उसेन बोल्टपासून ख्रिस्तियानो रोनाल्डोपर्यंत अनेक नावे आहेत. विख्यात बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन यांचे जम्पमॅन हे ट्रेडमार्क जगप्रसिद्ध आहे. तसेच रोनाल्डोचे सीआर7 आणि सीआर9 म्हणून ट्रेडमार्क आहेत. लिओनल मेस्सी आणि सचिन तेंडुलकर यांनी आपली नावे ट्रेडमार्क केली आहेत. बोल्टचे लायटनिंग बोल्ट ही पोझ, त्याचे नाव आणि स्वाक्षरी ट्रेडमार्क करण्यात आली आहे. रॉजर फेडररचे आरएफ नावाचे लोगो ट्रेडमार्क केले गेले आहे. तसेच पेले, सेन्ना, नेमार, रोनाल्डिन्हो आणि झिको या ब्राझिलियन फुटबॉलपटूंचे ब्रॅण्ड्स ब्राझील आणि जगभरात नोंदणीकृत आहेत. इंग्लिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचे बेकहॅम नावाने जगभरात अनेक उत्पादने विकली जात आहेत.