
रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संपुलाच्या मैदानावर रविवारी गायक महेश काळे यांचा ‘स्वरसंध्या’ हा गाण्यांचा कार्यक्रम होणार होता. हा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द करण्यात आला. मात्र, ऑनलाईन तिकीटं बुक करणाऱया प्रेक्षकांना कार्यक्रम रद्द झाल्याची कोणतीच कल्पना देण्यात आली नाही, असा आरोप आहे. असे अनेक प्रेक्षक रविवारी कार्यक्रमस्थळी दाखल झाले आणि गोंधळ उडाला. आमची फसवणूक झाल्याचे सांगत या प्रेक्षकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, तसेच तिकिटासह प्रवास खर्च मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
महेश काळे यांचा ‘स्वरसंध्या’ हा गाण्यांचा कार्यक्रम एकदंत थिएटर्स आणि ताल क्रिएशन्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची तिकीट विक्री ‘बुक माय शो’ अॅपवर सुरू होती. रत्नागिरीसह कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथून रसिक प्रेक्षकांनी तिकिटे खरेदी केली. रत्नागिरीतील प्रेक्षकांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाटय़गृहाच्या तिकीट खिडकीवरून तिकिटे खरेदी केली होती. सुमारे दीड हजार आसन क्षमता असणारा हा कार्यक्रम होता.
ऑनलाइन बुकिंग करणाऱया प्रेक्षकांना कार्यक्रम रद्द झाल्याचे कळवण्यात आले नाही. अनेक प्रेक्षक रविवारी कार्यक्रमस्थळी दाखल झाले, तेव्हा मैदानावर स्टेज वा खुर्च्या काहीच नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. चौकशी केली असता कार्यक्रम रद्द झाल्याचे त्यांना कळले. कोल्हापूर, मुंबई आणि पुण्यातून आलेल्या अनेक प्रेक्षकांना त्यामुळे मनस्ताप झाला. येण्याजाण्याचा आणि हॉटेलच्या बुकिंगच्या खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागला. तिकिटाचे पैसेही अद्याप परत केले नाहीत, असा आरोप करत या प्रेक्षकांनी पोलीस ठाणे गाठले. तक्रार अर्ज देत आयोजकांवर कारवाई करावी व आमची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.



























































