
अवैध वाळूचा उपसा करून ती बेकायदेशीपणे विक्री व्यवसाय करणारा वाळूतस्कर आणि सराईत गुन्हेगार महेश तानाजी शिंदे (रा. इसबावी, पंढरपूर) याला एक वर्षासाठी एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
सराईत आरोपी महेश शिंदे याच्यावर वाळूच्या कारणावरून जीव घेणे, हल्ले करणे, दमदाटी, मारहाण करून गौण खनिज चोरी करणे, असे गुन्हे दाखल आहेत. त्याला अनेकवेळा अटक करण्यात आली होती. परंतु, तो जामीन मिळवून अवैध वाळू व्यवसाय करीत होता.
त्यामुळे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी त्याला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्यामार्फत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना पाठविला होता. त्यानुसार एमपीडीए कायद्याअंतर्गत त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक संजय जगताप, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.





























































