
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हॉलिवूडपासून ते बॉलिवूड व टॉलिवूडपासून ते मराठी इंडस्ट्री या चित्रपट निर्मिती क्षेत्राला कास्टिंग काऊचचे ग्रहण लागले आहेत. यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचबाबत मोठे खुलासे केले आहेत. आता यात आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. अनुराग कश्यपचा ‘देव डी’ या चित्रपटाद्वारे चर्चेत आलेली आणि सध्या ‘साहिब बीबी गँगस्टर ३’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली अभिनेत्री माही गिल हिने कास्टिंग काऊचबाबत गौप्यस्फोट केला आहे. एनबीटीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने याबाबत वक्तव्य केले आहे.
मुलाखतकाराने कास्टिंग काऊचबाबत प्रश्न विचारला असता आपला अनुभव कथन करताना माही म्हणाली की, ‘ही गोष्ट माझ्या करिअरच्या सुरुवातीची आहे. तेव्हा मी नुकतेच चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. एका चित्रपटाच्या भूमिकेसाठी माझी दिग्दर्शकासोबत भेट झाली होती. त्याला भेटण्यासाठी पोहोचले तेव्हा तो म्हणाला की मला तुला पारदर्शक नाईटमध्ये पाहायचे आहे. दिग्दर्शकाचे असे बोलणे ऐकल्यानंतर मी तेथून पळ काढला होता. मी त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत होते, परंतु दिग्दर्शकाचा त्या घृणास्पद प्रकाराला नाही म्हणण्याची हिम्मत माझ्यात होती. त्या दिवशी मी नकार दिला नसता तर कास्टिंग काऊचची शिकार झाली असते. मला माहीत आहे प्रत्येक जणामध्ये नाही म्हणण्याची हिम्मत नसते. कारण काहींना आपल्या करिअरबाबत चिंता असते, काम न मिळण्याची भीती असते. परंतु असे प्रकार सोडले तर बॉलिवूड तशी सेफ इंडस्ट्री आहे. येथे कोणी तुमच्यावर जबरदस्ती करत नाही.’
पुढे बोलताना ती म्हणाली की, ‘अशा बाबतींमध्ये लहान शहरातून आलेल्या तरुणांना जास्त त्रास होते. अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये कसे वागावे हे त्यांना समजत नाही. तर काही तरुणी नाही म्हणण्याची हिम्मत दाखवू शकत नाही आणि कास्टिंग काऊचची शिकार होतात. ही गोष्ट अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. परंतु माझ्यात हिम्मत होती आणि मी नाही म्हणाले. त्यामुळे कास्टिंग काऊचपासून वाचले.’























































