माहीम मच्छीमार महासंघाचा भाजपच्या धमकीविरोधात संताप …म्हणे ‘सी अँड डी’कडून पुनर्विकास करणार; 15 दिवसांत तीव्र आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहीम मच्छीमार नगर आणि परिसराचा पुनर्विकास बांधकाम आणि विकास संस्थेकडून (कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी) करण्याचे धमकीचे वक्तव्य पावसाळी अधिवेशनात करणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधात माहीम मच्छीमार महासंघाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मच्छीमार नगरातील महासंघ कार्यालयाजवळ मच्छीमारांनी एकत्र येत आमदार लाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला. 15 दिवसांत लाड यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भूमिपुत्रांनी दिला.

आमदार लाड विधान परिषदेत म्हणाले की, ‘सदरची जागा ‘म्हाडा’ची असताना तिथे फेडरेशन पुनर्विकास कसा करू शकते? ते जमिनीचे बाप आहेत की जमिनीचे मालक आहेत?’  त्यामुळे फेडरेशन व सहभागी विकासकांवर कारवाई करण्याची मागणीही लाड यांनी अधिवेशनात केली. त्यांच्या या वक्तव्याविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. ‘आमचे स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक आणि प्रतिनिधी कार्यरत असताना प्रसाद लाड यांना आमच्या मतदारसंघात ढवळाढवळ करण्याची गरज काय, असा सवाल भूमिपुत्रांनी उपस्थित केला आहे. लाड यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी येत्या 15 दिवसांत स्थानिक भूमिपुत्र एकत्रित येऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा माहीम मच्छीमारनगर सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ (मर्यादित) कडून देण्यात आला आहे. यावेळी महासंघाचे अध्यक्ष महेश तरे, सचिव दत्ता गडेकर, कोषाध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष अमित तांडेल, मोहन आक्रे, श्याम तुळसकर, स्थानिक नगरसेवक मिलिंद वैद्य यांच्यासह मोठय़ा संख्येने भूमिपुत्र उपस्थित होते.