लोकसभा अध्यक्षांचा विरोधी पक्षाचा माईक बंद करण्यात हातखंडा; महुआ मोईत्रा यांची बोचरी टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर अत्यंत गंभीर आणि बोचरी टीका केली आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांचा माईक मध्येच बंद करण्याच्या कलेत लोकसभा अध्यक्षांनी नैपुण्य मिळवले आहे, असा थेट हल्लाबोल मोईत्रा यांनी केला.

महुआ मोईत्रा यांनी १७ व्या लोकसभेचा संदर्भ देत सांगितले की, “सध्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या कार्यकाळात विरोधी पक्षाच्या सदस्यांचे माईक वाक्याच्या मध्यभागीच बंद करण्याची पद्धत रूढ झाली आहे. आम्ही जेव्हा शून्य प्रहर किंवा महत्त्वाच्या प्रश्नांसाठी उभे राहतो, तेव्हा केवळ ३० सेकंदात संक्षिप्त मध्ये बोला, असे सांगून आमचा आवाज दाबला जातो. करदात्यांच्या पैशावर चालणारे संसद टीव्ही जाणीवपूर्वक विरोधी पक्ष बोलत असताना प्रक्षेपण रोखते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महुआ मोईत्रा यांनी सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, केंद्र सरकारने संसदीय लोकशाहीला सर्कस करून ठेवले आहे. “जर सभागृहाचे अध्यक्षच या सर्कसमध्ये सत्ताधाऱ्यांचे रिंग मास्टर म्हणून काम करणार असतील, तर देशातील लोकशाहीसाठी हा अत्यंत दुःखाचा दिवस आहे. सत्ताधारी बाकांवरील लोकांना तासनतास बोलू दिले जाते, मात्र ४१ कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विरोधकांना पद्धतशीरपणे गप्प केले जात आहे,” असेही त्या म्हणाल्या.

पूर्वीच्या सभापतींच्या कार्यपद्धतीची आठवण करून देताना मोईत्रा यांनी माजी पंतप्रधान चंद्रशेखर आणि बीजू पटनायक यांच्या काळातील उदाहरणे दिली. तेव्हा सभापती केवळ विरोधी पक्षनेत्यांनाच नाही, तर इतर ज्येष्ठ सदस्यांनाही चर्चेत हस्तक्षेप करण्याची आणि त्यांचे म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी देत असत, असे त्या म्हणाल्या.