
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप प्रकरणात (cash for query) लोकसभा अध्यक्षांनी मोईत्रा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या निलंबनावर तृणमूलच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. तर महुआ या पुढची लढाई जिंकणारच, असा विश्वासही बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.
दार्जिलिंग येथील एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, मी तुम्हाला सांगतेय की महुआ परिस्थितीची बळी बनली आहे. मी याचा निषेध करते. आमचा पक्ष महुआसोबत असून इंडिया आघाडीसोबत आम्ही ही लढाई सुरू ठेवू. हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. आज भाजपची वृत्ती पाहून मला खेद वाटतो. भाजपने लोकशाही राज्यव्यवस्थेचा विश्वासघात केला, अशी टीका बॅनर्जी यांनी केली.
भाजप लोकशाहीच्या पद्धतीने विरोधकांशी लढू शकत नाही. त्यामुळे ही कारवाई भाजपची सूडबुद्धी दाखवत आहे. तरुण पिढीशी संबंध असलेल्या एका महिलेचा छळ भाजपने मांडला आहे. ही कारवाई लोकसभेच्या 2024च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आली आहे. कारण, काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि महुआ या अजून एका संसदेच्या सत्रात सहभागी होऊ शकत होत्या. पण, त्या ही लढाई जिंकतील आणि भाजपला जोरदार प्रत्युत्तर देतील, असा माझा विश्वास आहे, असंही बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.

























































