आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हे देशपातळीवरील विकासाचे मॉडेल ठरले असून, तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींना ‘माझी वसुंधरा’ योजनेतून 4 कोटींची बक्षिसे मिळाली आहेत. राज्यपातळीवर संगमनेर तालुका प्रथम क्रमांकाचा ठरला आहे.
सततच्या विकासकामांमधून सर्वांगीण विकासाचा पॅटर्न राबवत ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून, 171 गावे व 248 वाडय़ावस्त्या आहेत. तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींना ‘माझी वसुंधरा’ योजनेअंतर्गत चार कोटींची बक्षिसे मिळाली आहेत. यामध्ये राज्यस्तरीय बक्षिसांमध्ये घुलेवाडी ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक मिळवत दीड कोटींचे बक्षीस व भूमी विभागातून 75 लाख रुपयांचे पहिले बक्षीस मिळवले आहे. तर, तिगाव ग्रामपंचायतला राज्यातून तृतीय क्रमांकाचे 50 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. तर, खांडगाव ग्रामपंचायतला राज्यातून सहाव्या क्रमांकाचे 50 लाखांचे बक्षीस मिळाले आहे.
विभागीय स्तरामधून गुंजाळवाडी ग्रामपंचायत 15 लाख रुपये, धांदरफळ बुद्रूक ग्रामपंचायत 15 लाख रुपये, पेमगिरी ग्रामपंचायत 15 लाख रुपये, चिंचोली गुरव ग्रामपंचायत 15 लाख रुपये, लोहारे ग्रामपंचायत 15 लाख रुपये व देवकौठे ग्रामपंचायतला 15 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. दहा ग्रामपंचायतींमधून एकूण चार कोटींची बक्षिसे मिळवली असून, अशी बक्षिसे मिळवणारा संगमनेर तालुका हा राज्यात प्रथम क्रमांकाचा ठरला आहे.