उपांत्य फेरीपूर्वी हिंदुस्थानला धक्का! सलामीवीर प्रतिका रावल दुखापतीमुळे बाहेर

हिंदुस्थान आणि श्रीलंकेत सुरू असलेला महिला एकदिवसीय विश्वचषक आता अंतिम टप्प्यात दाखल झाला असून येत्या 30 ऑक्टोबर रोजी हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा निर्णायक सामना रंगणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. संघाची विश्वासू सलामीवीर प्रतिका रावल दुखापतीमुळे उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी अनुपलब्ध राहणार आहे. त्यामुळे आता स्मृती मानधनासोबत सलामीला कोण उतरणार, हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.

मायदेशात सुरू असलेल्या या विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला संघाने अनेक चढ-उतार पार करत काठावरून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. विजेते पदाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर तगडय़ा ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध विजय मिळवणे हेच खरे आव्हान ठरणार आहे. मायदेशात विश्वविजेते पद पटकावण्याची सुवर्णसंधी असतानाच प्रतिकाच्या दुखापतीने संघाच्या गणितात मोठी उलथापालथ झाली आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना प्रतिकाचा पाय मुरगळला होता. त्या वेळी ती फलंदाजीसाठी उतरू शकली नव्हती. त्याच दुखापतीतून ती अजून पूर्णपणे सावरलेली नसल्याने ती 30 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघासमोर प्रतिकाची अनुपस्थिती टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.

बीसीसीआयनं आपल्या एक्स अकाउंटवरून माहिती दिली की, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना प्रतिकाच्या पायाच्या घोटय़ाला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. ती सध्या बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली आहे. एकाच पायावर दोन दुखापती असल्याने ती ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल की नाही, याबाबत संभ्रम आहे.

या स्पर्धेत प्रतिकाने सहा डावांत 51.33च्या सरासरीने 308 धावा केल्या आहेत. ती स्मृती मानधनानंतर संघातील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तिने खेचून आणलेली शतकी खेळी संघासाठी निर्णायक ठरली होती. त्यामुळे उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रतिकाची गैरहजेरी निश्चितच संघाला जाणवणारी ठरेल. आता स्मृती मानधनासोबत सलामीला कोण उतरणार हा प्रश्न उभा राहिला आहे. अमनजोत कौरला संधी मिळण्याची शक्यता जास्त मानली जात आहे, कारण ती बांगलादेशविरुद्ध प्रतिकाच्या जागी सलामीला उतरली होती.

तथापि हरलीन देओल हाही पर्याय चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणे सहज शक्य नाही, परंतु योग्य संयोजन आणि फलंदाजीत स्थैर्य राखता आलं, तर हिंदुस्थानच्या महिला पुन्हा एकदा इतिहास रचू शकतात.