मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याजवळील सचिवालयानजीकच्या इमारतीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट

मणिपूर हिंसाचाराने होरपळत असताना इंफाळमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. मणिपूरची राजधानी इंफाळमधील उच्च सुरक्षा सचिवालय संकुलाजवळील इमारतीला शनिवारी भीषण आग लागली. ही इमारत मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. राज्यातील सचिवालय आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याजवळील इमारतीला आग लागल्याची घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी आल्या आणि संध्याकाळी आग आटोक्यात आणण्यात यश आले, असे पोलिसांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्या इमारतीला आग लागली ती इमारत कुकी इनपीच्या मुख्य कार्यालयाच्या संकुलात आहे. कुकी जमातींचा गट चुरचंदपूर-आधारित कुकी गटाच्या इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमला (ITLF) पाठिंबा देत आहे. मणिपूरमध्ये वेगळे प्रशासन तयार करण्याची त्यांची मागणी आहे.

आसामच्या सीमेला लागून असलेल्या मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात खोऱ्यातील मतैई समुदाय आणि कुकी जमाती यांच्यात हिंसाचार सुरू आहे. अशाच हिंसाचाकाची घटना एका आठवड्यात घडली आहे. गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरवळत आहे.