पाथर्डीतील भाजपच्या शिबीराकडे प्रमुख नेत्यांनी फिरवली पाठ; राजकीय वर्तुळात चर्चा

नगर दक्षिण मतदार संघाच्या झालेल्या पाथर्डी येथील शिबीराकडे भाजपच्या प्रमुख नेत्यांनीच पाठ फिरवल्याने हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा झाला आहे. नगर दक्षिणमध्ये असलेल्या पाचही विधानसभा मतदारसंघात भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार निवडून द्यायचे यासाठी रविवारी येथील विठोबाराजे मंगल कार्यलयात भाजपने शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीयमंत्री डॉ. भागवत कराड व मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या शिबीराकडे प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे.

कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर नगर दक्षिण मधील सर्वच भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव टाकण्यात आली होते. मात्र शिबिराला माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी धावती भेट दिली व निघून गेले. तर पालकमंत्री विखे हे शिबीराकडे फिरकलेच नाही. तसेच भाजपचे विद्यमान आमदार राम शिंदे व बबनराव पाचपुते हेदेखील शिबिरात सहभागी झाले नाही. पाचपुते यांच्या वतीने त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते हे आले होते. तालुक्यात जे विखे समर्थक भाजप कार्यकर्ते आहेत त्यातील अनेकांनी शिबीराकडे पाठ फिरवली. भाजपच्या शिबीराला प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क केले जात असून याची चर्चा होत आहे.