योगाच्या माध्यमातून जीवन आरोग्यदायी बनवू या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगास अत्यंत महत्त्व असले पाहिजे. म्हणून योगाच्या माध्यमातून आपलं जीवन कायमस्वरुपी निरोगी व आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करू या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.

नांदेड येथे राज्य शासनाच्या वतीने तसेच विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी योगगुरु स्वामी रामदेवबाबा, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई चिखलीकर-देवरे, प्रविण पाटील चिखलीकर, संभाजीनगर विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव आदींसह हजारो योग साधक उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संयुक्त राष्ट्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला व हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात सर्वात कमी कालावधीत मंजूर झाला. आज जगातील १५० पेक्षा अधिक देशात सुदृढ आरोग्यासाठी योगासने केली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमास महाराष्ट्रात येण्याची विनंती बाबाजींना केली असता, त्यांनी ती तातडीने मान्य केली. त्यांना आम्ही हा कार्यक्रम मराठवाड्यातील नांदेड येथे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तेंव्हा त्यांना मोठा आनंद झाला होता. बाबाजी या राज्यस्तरीय शिबिरास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

हिंदुस्थान हा प्राचीन योग विद्येच्या माध्यमातून अध्यात्म महाशक्तीकडे वाटचाल करत आहे. तसेच या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, राजनैतीकदृष्ट्या भारत अधिक सुरक्षित होत असल्याचे रामदेवबाबा यांनी सांगून सन २०४० ते २०५० दरम्यान हिंदुस्थान विश्वातील सर्वात मोठे सामर्थ्यशाली राष्ट्र होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून येथे जमलेल्या प्रत्येक नागरिकांने योगधर्म, मानवधर्म, राष्ट्रधर्म व सेवाधर्माचा प्रामाणिकपणे अंगीकार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

योगा शिबिराची गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
एकाचवेळी एकाच ठिकाणी ९१ हजार ३२३ लोकांनी योगासने करण्याचा पूर्वीचा जागतिक विक्रम नांदेड येथील आजच्या राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी मोडला जाऊन नांदेडच्या पावनभूमीत एक लाख १० हजारापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी रामदेवबाबा यांनी योग विद्येचे प्रशिक्षण दिले व नवीन जागतिक विक्रमाला नांदेडकरांनी गवसणी घातली.

यावेळी गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनीष विष्णूई यांनी ड्रोनद्वारे प्राथमिक गणनेनुसार नांदेड येथील योग कार्यक्रमास एक लाख १० हजारापेक्षा अधिक लोक असल्याची माहिती दिली.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.