
सध्या दूध केंद्रावर 150 लिटर दूध प्रतिदिन विक्री करणे अनिवार्य आहे, पण सध्याची परिस्थिती लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आज दुधाचे संकलन, प्रक्रिया व वाटप करणे शक्य आहे का? दुग्ध शाळेद्वारे फक्त आरे शक्ती आणि स्पेशल दुधाची उपलब्धता नाही, इतकेच नव्हे तर दूध विक्री भरणा करण्यास प्रशासनाद्वारे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन प्रशासनाने प्रथम दूध विक्री यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशी ठोस भूमिका महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांनी नुकतीच मांडली.
आरे मध्यवर्ती दुग्धशाळेचे प्रभारी व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई पश्चिम उपनगरांतील 11 वॉर्डमधील दूध केंद्र संचालकांच्या विविध प्रश्नांसंदर्भातील विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र दूध वितरक सेनेने ही भूमिका मांडली. यावेळी कार्याध्यक्ष राम कदम, उपाध्यक्ष सुहास शिवडकर, कोषाध्यक्ष विलास भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत आरे दूध केंद्रावर आरे दूध विक्रीत झालेली घट, केंद्राचे थकलेले भाडे, दूध विक्री रक्कम थकबाकी, आरे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीस प्राधान्य आणि वितरकांच्या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
थकीत रकमेचा भरणा करण्याकरिता सहकार्य मिळावे
सध्याची कोविडची परिस्थिती लक्षात घेता दूध केंद्र सुरू करण्याबाबत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे याची गंभीर दखल घेत वितरक थकीत रक्कम वेळेत भरणा करतील, परंतु याकरिता प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी यावेळी महाराष्ट्र दूध वितरक सेनेतर्फे करण्यात आली आहे. कोविड परिस्थिती लक्षात घेता वितरकांना तत्काळ ओळखपत्र द्यावे आणि बंद असलेल्या सर्व दूध केंद्रांवर तातडीने दुधाचे वितरण सुरू करावे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.























































