मेकअपचा दादा गेला! पंढरीनाथ जुकर यांचे निधन

558

मीनाकुमारी, मधुबालापासून ते दिलीपकुमार, अमिताभपर्यंत… माधुरी-काजोलपासून शाहरूख हृतिकपर्यंत आणि सध्याच्या आघाडीच्या हिंदी-मराठी सिनेमा आणि मालिकेतील नायक-नायिकांपर्यंत ज्यांच्या रंगभूषेचा परिसस्पर्श झाला ते बॉलीवूडचे दादा मेकअपमन, ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे वय 88 वर्षे होते. पंढरीदादांच्या निधनाने बॉलीवूडमधील तीन पिढय़ांचा साक्षीदार हरपला आहे.

पंढरीदादा जुकर यांचे खरे नाव नारायण हरिश्चंद्र जुकर असे होते. मात्र संपूर्ण चित्रपट आणि नाटय़सृष्टी त्यांना पंढरीदादा या नावानेच ओळखत असे. ब्लॅक ऍण्ड व्हाईट चित्रपटांपासून त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात केली. जुकर यांनी साठच्या दशकात सहाय्यक रंगभूषाकार म्हणून चित्रपसृष्टीत पाऊल ठेवले. नायक-नायिकांचे पडद्यावरील सौंदर्य खुलवण्याच्या कौशल्यामुळे आघाडीचे रंगभूषाकार म्हणून त्यांची ओळख झाली. ते सिने क्षेत्रातील रंगभूषेची चालतीबोलती संस्थाच होते.

झनक झनक पायल बाजे, चित्रलेखा, ताजमहल, नीलकमल, काला पत्थर, शोले अशा 500हून अधिक चित्रपटांसाठी रंगभूषाकार म्हणून त्यांनी काम केले. मीना कुमारी, मधुबाला, नूतन, दिलीप कुमार, राज कपूर, अशोक कुमार, देव आनंद, राजेश खन्ना, सुनील दत्त, अमिताभ बच्चन, राज कुमार शाहरूख खान, आमीर खान, करीना कपूर, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्या चेहऱयाची रंगभूषा करून पंढरीदादांनी त्यांचे सौंदर्य रुपेरी पडद्यावर खुलवले होते.

चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल घेत पंढरीदादा यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता दादर येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पंढरीदादा या क्षेत्रात आले ते योगायोगानेच. वडील आजारी पडल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचे रंगभूषेचे गुरू बाबा कर्दम यांनी त्यांना ‘राजकमल’मध्ये काम करण्याची संधी दिली. ‘राजकमल’मध्ये गेल्यानंतर फक्त एक दिवसाचे त्यांनी ट्रेनिंग घेतले आणि दुसऱयाच दिवशी पहिलाच मेकअप त्यांनी चित्रपती व्ही. शांताराम यांचा मेकअप केला. पुढे त्यांना ‘राजकमल’मध्ये मेकअप आर्टिस्टची नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. रंगभूषेचा जादूगार हीच पंढरीदादांची ओळख ठरली.

परदेशात शिष्यवृत्ती मिळवूनही दीड वर्ष काम नाही

‘परदेसी’ सिनेमापासून ते फ्री लान्सिंग म्हणून काम करू लागले. त्यानंतर बरेच चित्रपट मिळाले. रशियन सरकारची फेलोशिप त्यांना मिळाली. रशियात मेकअपचा डिप्लोमा करून ते हिंदुस्थानात परतले. परदेशात शिकून आलेला माणूस जास्त पगार घेईल या भीतीने जवळपास दीड वर्ष त्यांना कोणत्याही स्टुडिओत काम दिले नाही.

‘परदेसी’ने बदलले आयुष्य

‘झनक झनक पायल बाजे’साठी जिमी कायनिंग हे मेकअप आर्टिस्ट आले होते. त्यांच्या हाताखालीसुद्धा शिकण्याची पंढरीदादांनी संधी मिळाली. एक दिवस स्टुडिओत मेकअप करताना तिथे नर्गिसचं शूटिंग चालू होतं. तिने पंढरीदादांचे काम पाहिले. त्याच वेळी तिच्याकडे ‘परदेसी’ सिनेमा आला होता. त्यासाठी तिने मेकअप आर्टिस्ट म्हणून पंढरीदादांचे नाव सुचवले. या चित्रपटाच्या चमूसोबत त्यांना रशियात जाण्याची संधी मिळाली.

मीनाकुमारीला दिली नवी ओळख

17 वर्षे त्यांनी बी. आर. चोप्रा यांच्याकडे काम केले. ‘चार दिल चार राहे’ सिनेमात मीनाकुमारी, राज कपूर, शम्मी कपूर, निम्मी, अजित, कुमकुम हे कलाकार काम करत होते. मीनाकुमारीने तेव्हा सांगितलं की, माझा स्वतःचा मेकअप आर्टिस्ट माझा मेकअप करायला येईल, पण त्या सिनेमाचे दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांनी सांगितलं की, या मुलाचा मेकअप तुम्ही बघा, तो नाही आकडला तर तुम्ही तुमच्या मेकअप आर्टिस्टला बोलका. पंढरीदादा यांनी केलेला मेकअप सगळ्यांना खूप आकडला. त्यामुळे ब्लॅक प्रिन्सेस म्हणून मीनाकुमारी ओळखली जाऊ लागली. यश चोप्रा यांनी वेगळी कंपनी सुरू केल्यानंतर यश चोप्राबरोबर त्यांनी 42 वर्षे काम केले.

आपली प्रतिक्रिया द्या