मंदिरात घुसून अल्ला हो अकबरचे नारे; मलंगगडावर धर्मांधांचा धिंगाणा

जय मलंग… श्री मलंग अशा जयघोषाने प्रत्येक पौर्णिमेला दुमदुमून जाणाऱया मलंगगडावर या पौर्णिमेला धर्मांधांनी धिंगाणा घातला. मच्छिंद्रनाथांच्या समाधीस्थळी आरती सुरू असतानाच 50 ते 60 धर्मांध मंदिरात घुसले आणि त्यांनी आरती बंद पाडली. अल्ला हो अकबरचे नारे देत त्यांनी हिंदू भाविकांना धक्काबुक्कीही केली. या प्रकारामुळे हिंदू बांधवांमध्ये प्रचंड असंतोष असून शहरात तणावाचे वातावरण आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची माघ पौर्णिमेला होणारी श्रीमलंग यात्रा रद्द करण्यात आली. मात्र शिवसेनेच्या आग्रहामुळे मच्छिंद्रनाथांच्या समाधीस्थळी सर्व धार्मिक विधी हिंदू परंपरेप्रमाणेच करण्यात आले. शासन नियमाप्रमाणे शासकीय अधिकारी आणि मानकरी अशा 50 भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात वार्षिक स्नान, पालखी, गंधलेपन, नैवेद्य, महाआरती असे विधी पार पडले.

हा राग मनात धरून काही धर्मांधांनी या पौर्णिमेला होणारी आरती उधळून लावण्याचा डाव आखला. हिंदू संघटनांना याबाबतची कुणकुण लागताच त्यांनी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी कोरोनाचे कारण देत केवळ सात हिंदू भाविकांना आरतीसाठी मंदिरात परवानगी दिली.

आरती सुरू झाल्यानंतर केवळ पाचच मिनिटांत 50 ते 60 धर्मांधांचा जमाव मंदिरात घुसला. त्यांनी अल्ला हो अकबरचे नारे दिले. आरतीत व्यत्यय आणत ती बंद पाडली. हिंदू भाविकांना धर्मांध धक्काबुक्की करत असतानाही पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती.

चार दिवसांचा अल्टिमेटम

हिंदू मंचच्या कार्यकर्त्यानी हिल रोड स्टेशन पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करता केवळ चौकशी करू, असे आश्वासन दिले. यामुळे चार दिवसांत धिंगाणेखोरांना अटक केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रमेश पाटील, पराग तेली, समीर भंडारी यांनी दिला.

शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन बासरे यांनी हिंदू भाविकांच्या भावना दुखावण्याची धर्मांधांची हिंमत होतेच कशी, असा सवाल करत येत्या पौर्णिमेला होणारी आरती रोखून दाखवावी, असे आव्हानच दिले.

आपली प्रतिक्रिया द्या