
मलेशियाने आशिया कप पुरुष हॉकी स्पर्धेत सोमवारी चिनी तैपेईची 15-0 गोल फरकाने दाणादाण उडवत स्पर्धेतील विक्रमी विजय नोंदवला. हा विजय केवळ मलेशियन संघाच्या सामर्थ्याचा पुरावा नाही, तर आंतरराष्ट्रीय हॉकीत अनुभव आणि तयारी किती महत्त्वाची असते याचे धडेच जणू मलेशियाने चिनी तैपेईला दिले.
याआधी, रविवारी चीनने कझाकिस्तानला 13-1 ने पराभूत करून सर्वात मोठा विजयाचा विक्रम केला होता, मात्र मलेशियाने एका दिवसातच चीनचा तो मागे टाकताना नवख्या चिनी तैपेई संघाला अक्षरशः निष्प्रभ केले. ‘ब’ गटातून आधीच सुपर-4 मध्ये पोहोचलेल्या मलेशियासाठी हा औपचारिक सामना होता, मात्र लागोपाठच्या पराभवामुळे चिनी तैपेईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
अखिमुल्ला अनाउरचा चमकदार खेळ
मलेशियासाठी अखिमुल्ला अनाउर हा स्टार ठरला. त्याने एकट्याने पाच गोल केले. अशरान हमशानीने चार, तर नूरशफीक सुमंत्रीने तीन गोल केले. त्याशिवाय अइमान रोजेमी, एंडीवालफियन जेफ्रीनस आणि अबु कमाल अजरई यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. सामन्यात मलेशियाला तीन आणि चिनी तैपेईला चार पेनेल्टी कॉर्नर मिळाले, मात्र दोन्ही संघांना त्याचा फायदा घेता आला नाही. मलेशियाचे 15 पैकी 14 मैदानी गोल केले, तर एक गोल पेनेल्टी स्ट्रोकवरून झाला. यामुळे या लढतीत मलेशियाची योजनाबद्ध खेळाची आणि मैदानावरील पकडीची स्पष्ट झलक दिसली.
कोरियाचा बांगलादेशवर दमदार विजय
दक्षिण कोरियाने बांगलादेशवर 5-1 असा दणदणीत विजय मिळवून आशिया कप पुरुष हॉकी स्पर्धेत सोमवारी ‘ब’ गटातून सुपर फोरममध्ये प्रवेश निश्चित केला. सामना सुरू होण्यापूर्वीच कोरिया प्रबळ दावेदार मानला जात होता आणि त्यांनी अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवले.
कोरियाच्या स्टार खेळाडू डेन सोनने पहिले गोल करत खाते उघडले. दोन मिनिटांतच त्याने पेनेल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल करून बांगलादेशी बचावरेषेला हादरवून सोडले. पहिल्या क्वार्टरअखेर कोरिया 2-0 ने पुढे होता. 16व्या मिनिटाला सिंगबू लीने, तर 22व्या मिनिटाला सेयोंग ओहने प्रत्येकी एक गोल केला आणि स्कोर 4-0 केला. त्यानंतर लगेचच बांगलादेशसाठी शोहानुर शोबुजने पेनाल्टी कॉर्नरवर एकमेव गोल करत संघाला सन्मानजनक बळ दिले.