2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना सात साक्षीदार तपासण्यास विशेष एनआयए न्यायालयाने मंगळवारी परवानगी दिली. पुरोहित यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासण्यासाठी परवानगी मागितली होती, मात्र एनआयएने आक्षेप घेतल्यानंतर न्यायालयाने लष्कर अधिकारी व आणखी एका साक्षीदाराचे नाव वगळले.
पुरोहित हे मागील 16 वर्षांपासून खटल्याला सामोरे जात आहे. हा खटला चालवण्यासाठी दिलेली मंजुरी, बेकायदा अटक, ताब्यात घेणे व दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवणे या मुद्दय़ांवर नऊ साक्षीदार तपासण्याची इच्छा पुरोहित यांनी व्यक्त केली होती. त्यापैकी सात साक्षीदार तपासण्यास एनआयए न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी परवानगी दिली. मालेगाव बॉम्बस्फोट खटला अंतिम टप्प्यात असून न्यायालय फौजदारी दंड संहितेच्या कलम 313 अन्वये आरोपींचे जबाब नोंदवत आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला होता. त्यात सहा लोकांचा मृत्यू, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणात एकूण 13 आरोपींपैकी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सहा जणांविरुद्ध खटला चालवला आहे.