मालेगाव येथे यंत्रमागधारकांचा बंद; कोट्यवधींची उलाढाल थंडावली

464
Power loom

केंद्र सरकारचे चुकीचे निर्यात धोरण, वाढते वीज दर यांच्या निषेधार्थ मालेगाव येथील यंत्रमागधारकांनी पुकारलेल्या पाच दिवसांच्या बंदला आज सुरूवात झाली. दिवसभर तीन लाखांहून अधिक यंत्रमाग ठप्प असल्याने कोट्यवधींची उलाढाल थंडावली होती. हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मालेगाव शहर, द्याने, मालदे, सायने व परिसरातील सहा गावांमध्ये तीन लाखांहून अधिक यंत्रमाग उद्योग आहेत. यावर हजारो कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, नोटाबंदीपासून हा उद्योग संकटात सापडला. त्यातच आता महावितरणने वीस टक्के दरवाढ केली. वस्त्रोद्योगांसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. आपल्याकडे कापड उत्पादनाचा खर्च अधिक आहे, त्यातुलनेत चीन, बांग्लादेशमधील उत्पादन खर्च कमी असून, त्यांच्या कपड्यांना जागतिक बाजारपेठेत मागणी आहे. त्यामुळे निर्यात वाढविण्यासाठी केंद्राने उत्पादन खर्च कमी होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलावी. तामिळनाडू, गुजरातच्या सूत गिरण्यांमधून सूत आणणे मोठे खर्चिक आहे, त्यावर उपाययोजना कराव्यात, तीन रूपये वीस पैसे प्रती युनिट दराऐवजी दोन रूपयेप्रमाणे वीज मिळावी, या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.

मालेगाव येथील बारा संघटनांनी एकत्रित येत मालेगाव यंत्रमाग संघर्ष समिती स्थापन करून हा बंदचा निर्धार केला. आज पहिल्याच दिवशी यंत्रमाग बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. समितीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी समिती अध्यक्ष युसूफ इलियाज, साजिद अन्सारी, यासिम जवाहीर, इस्माइल मुल्ला, अन्वर भिंवडी, इक्बाल अमर वीर, निहाज दाणेवाले, शब्बीर डेगवाले यांच्यासह यंत्रमागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या