किनारा चिमुकल्या जगाचा

272

>> मलिका अमरशेख

निसर्गाचं आणि मानवाचं सख्य वेगळं आहे… असायलाच हवं. पृथ्वीच्या आणि त्यानंतर झालेल्या मानवाच्या प्रत्येक उक्रांतीत निसर्गाचं देणं आहेच. हे देणं स्मरूनच मानवाचं प्रत्येक प्रत्येक पाऊल पढलं पाहिजे. पण तसं घडत नाहीच. आज, आत्ता या क्षणालाही निसर्ग मानवाच्या खिजगिणतीत नाहीये. असं असतातना तिथे निसर्गाचं अवलोकन करणं कसं घडावं… आपण खरंच विसरून गेलोय फुलपाखराच्या पंखावरील नक्षी पाहणं… गुलाबाच्या तलम पाकळय़ांच्या आतले रेशमी रंग अनुभवणं… टवटवीत होणारी पालवी न् पालवी… फांद्या बोलावत राहतात पाखरांना… ‘या नं या इथं बांधा नं घरटं…’ असं माणसामाणसांत बोलायची पद्धत नाही. उलट हुसकूनच लावतात घरातून… जीवनातून… किंवा अगदी गर्भातल्या घरटय़ातून…

निळंभोर निरभ्र आकाश – इतकं स्वच्छ की धुऊन वाळत टाकलंय न् त्यावर पहाटवेळेचं कोवळं उैन सांडलेल्या घारीचा ‘किर्र किर्रर्र क्रिंचचच…’ आवाज इतका सुंदर वाटत होता त्या पवित्र शुभ शांततेत – कोटय़ावधी वर्षांनी इतकं एकसंध आभाळ पाहय़लं – मुंबईत दिसतं ते चमचाभर उैन न् उंच इमारती न् केबलच्या तारांनी कापलेलं तुकडय़ा तुकडय़ाचं आभाळ – मी चपला काढून त्या ओल्या हिरव्या गवतावर चालू लागले – जणू मी प्रथमच मातीला गवताला स्पर्श करीत होते! प्रथमच चालू लागणाऱया बाळाचा हर्षभरा आनंद अनुभवला…

10-15 घारी संथपणे घिरटय़ा घालत होत्या… त्या एका वर्तुळात एकमेकांना छेद देत अत्यंत सराईतपणे सहज – जणू एखाद्या कुशल चित्रकारानं कॅनव्हासवर रेषांकित चित्र काढावं.. एखाद्या कसलेल्या गवयानं सहजसुंदर तानेचा पलटा मारावा… निर्नादमय आलापाच्या लकेरी… तशा त्या घारींची संथ शांत आनंदमयी उडान पाहताना मन मुग्ध लुब्ध झालं… अगदी… खूप खूप खूप उंचावर एकच ठिपका स्तब्ध… ती ही घारच… पण एकटी… न् ती ही इतकी उंच… न् असं वाटत होतं ती एकाच जागी थांबलीय… जणू आकाशाला चिकटून बसलेलं घारीचं चित्रच!

तिला वरून… इतक्या उंचावरून खालचं जग कसं दिसत असेल? खेळातलं चिमुकलं जग… त्यातली चुळचुळ मुंगळय़ागत धावणारी माणसं नावाचे किडे-सुळकन् पळणाऱया गाडय़ा – इमारतींची छोटी खोली – एखाद्या यशस्वी कर्तृत्वान माणसासारखं तिला समाधान वाटत असेल का की सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्या माणसाचा उग्र गर्व की यातलं काहीच नाही. एखाद्या तान्हय़ा बाळाइतकं निर्मळ. न कसलाही विकार नसलेलं मनासारखं असेल तिचं मन… फक्त एवढय़ा उंचावरून तिला हिरवंगार झाड न् त्यातलं तिचं घरटं एवढंच दिसत असेल न् त्यातलं तिचं छोटं पिल्लू हो ः कदाचित तिला तेवढंच दिसत असेल.

बाजूच्या छपरांवरून कबुतरं उडत होती. दोन साळुंक्या चक्क चालत चाललेल्या… काही तरी टिपत… एक तुर्रेबाज कोंबडा ऐटीत एकटाच बागेत हिंडत होता… जणू ती बाग त्याच्या मालकीची होती…
अचानक पलीकडून एक कुत्रा इतक्या घाईघाईनं आला… इकडे तिकडे भरभर पाहय़लं न् इतक्या झपझपा चालू लागला की, त्याला जणू कामावर जायला उशीर झाला होता… असे सगळेजण त्यांच्या त्यांच्या कामावर पहाटेपास्नच रूजू झालेले.
…माणसांची जमात अंगडीटोपडी घालून मोठमोठय़ानं बोलत सावकाश रांगत चालत इथून तिथे न् तिथून इथे जात – येत होती. बोलणं हे एकमेव खूप महत्त्वाचं काम होतं न् त्यांच्याशिवाय ते कुणालाच जमणार नव्हतं. कुणी ऐको न ऐको ते बोलत चालत फिरत होते न् अधूनमधून अचानक विसरलेलं आठवावं तसं कामाच्या भोज्याला शिवून परत येण्यासाठी लगबगीनं चालते व्हायचे…
निसर्गाने विणलेल्या सुंदर अतुलनीय चित्राकडे कुणीच पाहत नव्हतं. ‘त्यात काय पाहायचं?’

– आमच्या कविमित्रानं सांगितलेला किस्सा आठवला –
‘पहिल्यांदाच हिलस्टेशनला निघालेल्या कुणी गाईडला सांगितलं…
‘‘अहो, निसर्गसौंदर्य आलं की उठवा बरं का!!’’ तर तो गाईड म्हणाला, ‘‘तर… अहो एवढं टॅफिक संपलं की बघा निसर्गसौंदर्य कचऱयासारखं पडलंय बाहेर…’’!!
आपल्याला खरंच वेळच नाही. फुलपाखराच्या पंखावरील नक्षी पाहायला… गुलाबाच्या तलम पाकळय़ांच्या आतले रेशमी रंग पाहायला… झाडांची काळजी तर पावसाळाच तो येणार तेव्हा पानं अंघोळ करून मंद हसणार. टवटवीत होणार पालवी न् पालवी… फांद्या बोलावत राहतात पाखरांना… ‘या नं या इथं बांधा नं घरटं…’
असं माणसा माणसांत बोलायची पद्धत नाही. उलट हुसकूनच लावतात घरातून…
लबाड धूर्त कावळीण कोकिळेच्या घरटय़ात अंडी घालते. बिचारी कोकिळ काकूंच्या लक्षातच येत नाही. पण जेव्हा लक्षात येतं तेव्हा कोकिळकाकू कावळा पिल्लांना ढकलून देत नाही. माणसांच्या मध्ये स्वतःच्या पिलांना इवल्या इवल्या ते उकिरडय़ावर जिवंतपणीच फेकतात. किंवा मारूनच टाकतात. गर्भातल्या घरटय़ात ती असतानाच – काहीवेळा ती पिल्लंसुद्धा मोठी झाल्यावर माणूस आई-बापांना फेकून देतात घराबाहेर- वृद्धाश्रमात. हॉस्पिटलच्या दारात. एकूण माणसांच्या जगात फेकाफेकीच जास्त!

निसर्गाच्या कुशीत असणारी पाखरं खूप शहाणी असतात. पाखरीणबाई खूप चोखंदळ… मनधरणी- पिसारा फुलवून नाचणं तिच्या मागेमागे फिरणं हे सगळे ‘फिल्मी’ प्रकार करून झाल्यावर पण त्या बधत नाहीत. मग पाखरूबुवा असंख्य खेपा करून एकएक काडीगोळा करून घरटं बांधतत. वाळलेली पानं… वाळलेली फुलं गवत यांचा चोचीनं विणून मऊसूत सुबक बिळांना तरंगता पाळणा केला जातो. – पाखरीणबाई घरटं नीट पारखून बघतात… ते पसंत पडल्यावरच त्या संसार सुरू करतात. पिलांना भरवणं हे आळीपाळीनं संगोपन पार पाडतात. मोठय़ा पक्ष्यांपासून सापापासून त्यांचं संरक्षण हे पण कठीण काम. माणसांच्या पिलांच्या ऍडमिशनपेक्षा ते कठीण! सरशेवटी पिलांना पंख फुटतात! की ते जेव्हा घरटय़ाबाहेर झेप घेतात… तेव्हा ते पाखरं आई-बाबा जराही मोह न ठेवता पिलांना न् घरटय़ाला ‘गुडबाय’ करतात. पिलांना जन्म दिला… वाढवलं दाणापाणी चोचीत भरून आता त्यांनी आपल्याला दाणापाणी द्यावं असा विचार न करता ते पुनःश्च नवीन घरटं नवीन संगोपन यासाठी बाहेर पडतात! (उडतात!) निसर्गाच्या रचनेत फक्त ‘देणं’ आहे! ‘घेणं’ नाही!!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या