बेशुद्ध पडलेल्या मालीवाल यांना पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

397

बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत फासावर लटकवण्यात यावे या मागणीसाठी गेल्या 13 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची प्रकृती बिघडली आहे. आज पहाटे प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यापूर्वी कालच डॉक्टरांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला होता. तसेच उपोषण संपुष्टात न आल्यास मूत्रपिंडाला नुकसान पोहचू शकते, असेही डॉक्टरांनी सांगितले होते पण त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला होता. मात्र, रविवारी पहाटेच्या सुमारास प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना पोलिसांनी रुग्णकाहिकेतून एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

त्याआधी शनिवारीच मालीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संपूर्ण देशात ‘दिशा विधेयक’ तातडीने लागून करण्याची मागणी केली होती. हैदराबाद येथे पशुवैद्यकीय डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून जाळून टाकण्याच्या घटनेनंतर स्वाती मालीवाल यांनी महिला अत्याचाराविरोधात 3 डिसेंबरपासून उपोषण सुरू केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या