उपनगरात मल्लखांबाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटलेले राष्ट्रीय मल्लखांबपटू, उपनगर संघटनेचे संस्थापक आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त दत्ताराम दुदम यांच्या कार्याला मानाचा मुजरा ठोकताना त्यांच्या नावाने नव्या दमाच्या किशोर आणि किशोरी गटातील मल्लखांबपटूंना उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार दिला जाणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. या पुरस्कारासह विजेत्यांना रोख पाच हजार रुपयांची शिष्यवृत्तीही दिली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष करुणाकर शेट्टी यांनी दिली.
नुकतीच उपनगर मल्लखांब संघटनेची वार्षिक सभा पोईसर जिमखान्यात पार पडली. ज्यात जिह्यातील 100 पेक्षा अधिक सदस्यांची उपस्थिती लाभली होती. या सभेत मल्लखांब खेळाच्या व संघटनेच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन सर्व संघटकांना करण्यात आले आहे. या सभेत मल्लखांब खेळातील द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त गणेश देवरुखकर, दुसऱ्या विश्व मल्लखांब स्पर्धेतील विजेते जान्हवी जाधव व अक्षय तरळ, तसेच उपविजेती रूपाली गंगावणे यांचे कौतुक करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे मल्लखांबपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून यंदापासून 14 वर्षाखालील वयोगटातील मल्लखांबपटूंना ‘दत्ताराम दुदम उत्पृष्ट खेळाडू पुरस्कार’ म्हणून गौरविले जाणार असल्याचे ठरवण्यात आले. त्यामुळे विराज आमरे, तन्वी दवणे यांचा सन्मान करत या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली.