
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. सार्वजनिक आणि सामाजिक कल्याणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ख्रिस्ती संस्था, स्वयंसेवी संस्था (NGOs) आणि नागरी संस्थांवर हल्ला करण्यासाठीच पंतप्रधान मोदींना फॉरेन कंट्रीब्यूशन (रेगुलेशन) एक्ट (FCRA) मध्ये बदल करायचे आहेत, असा दावा खरगे यांनी केला. इडुक्की विधानसभा मतदारसंघातील यूडीएफच्या (UDF) जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी मल्लिकार्जुन बोलताना खरगे म्हणाले की, “FCRA मधील प्रस्तावित बदल भाजप आणि मोदींचा खरा हेतू स्पष्ट करतात. हा कोणताही सुधारणावादी निर्णय नसून ख्रिस्ती संस्था आणि सामाजिक संस्थांवर केलेला हल्ला आहे.” पंतप्रधान मोदी या संस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. केंद्राने २५ मार्च रोजी लोकसभेत मांडलेल्या या दुरुस्ती विधेयकाचा उद्देश परदेशी निधीचा वापर पारदर्शक करणे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्याचा गैरवापर रोखणे, असा सांगितला आहे, मात्र खरगे यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावरही निशाणा
केरलचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर टीका करताना खरगे म्हणाले की, विजयन हे पंतप्रधान मोदींच्याच मार्गावर चालत आहेत. मोदीच विजयन यांना नियंत्रित करत असल्याचा दावा त्यांनी केला.
























































