
सामना प्रतिनिधी। मालवण
कश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. आंगणेवाडी यात्रोत्सवात जादा बस फेऱ्यांच्या पार्श्वभूमीवर मालवण एसटी आगाराचे चालक आणि खारेपाटण गावचे सुपुत्र संतोष पाटील यांनीही शहीद जवानांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली. पाटील यांनी आपल्या ताब्यातील एसटी बसच्या चारही बाजूना सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या संरक्षण समुग्रीची छायाचित्रे लावून तसेच बसमध्ये देशभक्तीपर गाणी लावून श्रद्धांजली वाहिली.
मालवण आगारात संतोष पाटील हे गेली अनेक वर्षे सेवा बजावत आहे. एसटी आपला संसार असून प्रवासी आपले कुटुंबातील सदस्य आहेत, असे ते सांगतात. शैक्षणिक सहल, प्रासंगिक करार तसेच एसटीच्या ज्यादा फेऱ्या असल्या की प्रवाशांना पाटील यांच्या ताफ्यातील एसटीने प्रवास करणे अधिक सुखकर वाटते.
दरवर्षी आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी बसमध्ये खास विद्युत रोषणाई, गाण्यांची व्यवस्था करणाऱ्या एसटी चालक संतोष पाटील यांनी यावर्षी मात्र शाहिदाना मानवंदना देण्यासाठी अनोख्या पद्धतीने एसटी बस सजविली. पुलवामा येथील आत्मघातकी हल्ल्यात आपले 40 जवान धारातीर्थी पडून शाहिद झाले. त्याच पार्श्वभूमीवर पाटील यांनी एसटीला सीमेवर लढणाऱ्या जवानांचे जीवन छायाचित्रांच्या माध्यमातून विशद केले.
‘पुलवामा श्रद्धांजली एक्स्प्रेस’
एसटी बसलाही ‘पुलवामा श्रद्धांजली एक्स्प्रेस’ असे नाव दिले. बसवर मालवण एसटी आगराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली असा फलक लावून आपले देशप्रेम अधोरेखित केले. पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल प्रवासी तसेच एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
चालक पाटील यांना त्यांच्या कुटुंबीयांनी युद्धभूमीवरची छायाचित्रे उपलब्ध करून देण्यात त्यांना त्यांच्या पत्नीकडून मोलाचे सहकार्य लाभले. तसेच आगारातील सर्व अधिकारी, चालक, वाहक तसेच कार्यशाळेतील कर्मचारी यांची साथ लाभली.































































