
मालवण बाजारपेठ मारुती मंदिर समोरील विलास एजन्सी या विलास हरमलकर यांच्या दुकानाला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीत लाखोंची हानी झाली आहे. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
दरम्यान, परिसरातील व्यापारी बांधवांनी त्याठिकाणी धाव घेत जीव धोक्यात घालून अथक मदतकार्य केले. तीन ते चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. नगरपालिका कर्मचारी, नगराध्यक्ष, नगरसेवक यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
बाजारपेठ येथील गुरुमाऊली या दुकानात रात्री उशिरा पर्यत माल लावण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारुती मंदिर समोरील विलास एजन्सी या दुकानातून आगीचे लोट येत असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत स्थानिक व्यापाऱ्यांना माहिती देत धाव घेतली.
स्थानिक व्यापारी फारूक ताजर, स्वप्नील अंधारी, विनायक सापळे, रणजित पारकर, शेखर अंधारी, सरदार ताजर, अमेय देसाई, विनू सापळे, हेमंत आचरेकर, साई मयेकर, राजेश मुंबरकर, शुभम अंधारी व अन्य व्यापारी यांनी पाणी, माती याचा वापर करून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. वीज कर्मचारी यांना बोलवत काही वीजपुरवठा खंडित करण्यात आला. नगरपालिका कर्मचारी वळंजू, कोकरे हेही घटनास्थळी पोहचले. आग विजवण्यासाठी पालिकेकडे असलेल्या फायर बॉल पैकी 7 ते 8 फायर बॉल आगीत टाकण्यात आले. मात्र आगीचा भडका मोठा असल्याने आग नियंत्रणात येत नव्हती.
अमेय देसाई यांनी गाडी धुण्यासाठी वावरण्यात येणारे फोर्स पाईप आणून अन्य वव्यापारी बांधवांसह लगतच्या दुकानांच्या छपरावर चढून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. स्वप्नील अंधारी, फारूक ताजर, रणजित पारकर हे काळोखात वरती अन्य दुकांनाच्या छपरावर चढून आग विझवत असताना रणजित पारकर हे छपरावरून कोसळले. त्यांना दुखापत झाली. नगराध्यक्ष यांचाही अंगावर विटा कोसळल्या. एकूणच स्थानिक व्यापारी आपल्या जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अथक प्रयत्न करत होते.
विलास ऍग्रोचे मालक विलास हरमलकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, बांधकाम सभापती मंदार केणी, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन तायशेटये, उमेश सापळे, दिलीप वायंगणकर यासह अन्य व्यापारी वर्ग मदतकार्यात सहभागी झाला होता.
व्यापारी अलर्ट असल्यामुळे अनर्थ टळला
बाजारपेठ येथील व्यापारी अलर्ट आल्यामुळे भडकत व आजूबाजूला पसरत जाणारी आग नियंत्रणात आणली गेल्याने मोठा अनर्थ टळला. विलास ऍग्रो यांच्या बाजूला असलेल्या रमेश पारकर यांच्याही दुकानाचे नुकसान झाले. मात्र व्यापारी बांधवांनी रात्रीच्या काळोखात मोठ्या हिमतीने व मेहनतीने आगीवर नियंत्रण मिळवले.























































