‘मिरी’ भरारीसाठी मालवण पंचायत समिती सज्ज; शेतकऱ्यांना लागवडीसाठी अनुदान मिळणार

सामना ऑनलाईन । मालवण

मसालावर्गीय पिकांमध्ये मिरी हे चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. मिरी लागवडीतून चांगली अर्थव्यवस्था तयार होऊ शकते. या दृष्टिकोनातूनच मालवण पंचायत समितीच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत केरळच्या धर्तीवर मिरी लागवडीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे निश्‍चित केले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी तथा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी मिरी लागवडीवर भर द्यावा, यासाठी पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील प्रत्येक गावात मिरी लागवडीचा प्रकल्प राबविला जाणार आहे. शेतकऱ्यांना नरेगामधून मिरी लागवडीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. मिरी लागवडीचा एक वेगळा प्रयोग करणारा मालवण तालुका हा जिल्ह्यातील पहिलाच तालुका ठरणार आहे. त्यादृष्टीने पंचायत समितीच्यावतीने नियोजनही करण्यात आले आहे

मिरी हे पीक कोकणात तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाण्याची मुबलक सुविधा उपलब्ध असलेल्या गावांमध्ये घेतले जाते. सध्या तालुक्यातील काही ठराविक गावांमध्येच शेतकर्‍यांकडून मिरीचे पीक घेतले जाते. त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील गावागावांत मिरी लागवडीचा प्रकल्प साकारले जावेत. यादृष्टीकोनातून तालुक्यातील बांदिवडे, कुडाळ तालुक्यातील वालावल येथील मिरी लागवडीच्या प्रकल्पांना भेट देत त्याची माहिती घेण्यात आली. या पाहणी दौर्‍यात सभापती सोनाली कोदे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर, विनोद आळवे, अजिंक्य पाताडे, कमलाकर गावडे, मनीषा वराडकर, तालुका कृषी अधिकारी एन. व्ही. करंजे, कृषी अधिकारी संजय गोसावी आदी सहभागी झाले होते. पाहणी दौर्‍यात मिरी लागवडीसाठी लागणारे साहित्य, लागवड कशी करावी, चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी कोणते खत वापरावे याची सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. बहुतांश भागामध्ये मिरी हे पारंपरिक पीक म्हणून घेतले जाते. या वेलवर्गीय पिकासाठी आधार म्हणून वेगवेगळ्या वृक्षांचा वापर केला जातो. यात अति उंचावर मिरी वेलींची वाढ होत असल्याने पीक तयार झाल्यावर वेळेत काढणी होत नसल्याने तसेच ते जास्त उंचीवर असल्याने पडून नुकसान होते.

मिरी पिकासाठी साधारण दहा फूट उंचीपर्यंत पाईप आधारित रचना केल्यास व जाळीमध्ये शेणखत, माती व सेंद्रिय पदार्थ व कोकोपीटचा वापर करून रचना केल्यास जास्तीत जास्त फुटवे येऊन चांगले पीक घेता येते. दहा फूटापर्यंतची उंची असल्यास छोट्या शिडीचा वापर करून मिरीचे पीक काढता येते. दहा फूट उंचीच्या पाईप रचनेत शेणखत, माती, कोकोपीट स्थानिक पातळीवर उपलब्ध असते. या रचनेवर तीन-चार मिरी रोप वेल लावून पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन केल्यास परसबागेत व्यापारीदृष्ट्या मिरीचे उत्पन्न घेणे शक्य आहे. दहा फूट उंचीच्या रचनेच्या मॉडेलसाठी सुमारे 1500 रुपये खर्च अपेक्षित आहे. पाच गुंठे क्षेत्रात 80 ते 100 मिरी रचनेचा समावेश केल्यास एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. मिरी लागवडीच्या एका युनीटपासून सुमारे तीन किलोचे तर 100 युनीटपासून तीनशे किलोचे मिरी उत्पन्न मिळू शकते. मिरी सध्या बाजारपेठेत सहाशे ते सातशे रुपये किलो दराने उपलब्ध होत असून तिला मागणीही मोठी आहे.