आंगणेवाडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या आदेशाने जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंद्यावर धडक कारवाई सुरू आहे. मसुरे पोलिसांनी बुधवारी दुपारी मालवण आंगणेवाडी येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर धाड टाकत कारवाई केली. दरम्यान या कारवाईत तीन मोबाईल, एक दुचाकी व रोख रकमेसह सुमारे 25 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर जुगार खेळणाऱ्या चार जणांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे.

मसुरे दूरक्षेत्राचे अंमलदार संतोष नांदोसकर, रुपेश गुरव, नितीन शेडगे यांनी आंगणेवाडी येथील दिनेश रमेश आंगणे यांच्या घराशेजारी असलेल्या पडक्या पडवीत धाड टाकली. यावेळी दिनेश याच्यासह पांडुरंग प्रभाकर मांजरेकर (रा. बांदिवडे मळावाडी), शाहिद रहिमान सय्यद, यासीन इस्माईल सय्यद (रा. मसुरे सय्यदजुवा) या चौघांना जुगाराचा पट मांडून खेळल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले. तर रोख रक्कम, तीन मोबाईल, एक दुचाकी व जुगाराचे साहित्य पोलिसानी जप्त केले. या चौघांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार कारवाई करण्यात आली असून मालवण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलीस अधिक तपास करत आहेत.