
सामना प्रतिनिधी। मालवण
मालवण शहरालगत असलेल्या कुंभारमाठ म्हाडा कॉलनी येथे एका बंद सदनिकेतील अवैध दारूसाठ्यावर शनिवारी रात्री मालवण पोलिसांनी छापा टाकला. यात गोवा बनावटीची १ लाख १० हजार रुपये किंमतीची दारू जप्त केली आहे. दरम्यान सदनिका भाड्याने घेणाऱ्या अनिल मुंज याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंभारमाठ येथील एका बंद घरात अवैध दारूसाठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर, सुनील वेंगुर्लेकर, विल्सन डिसोजा, अमोल महाडिक, महिला पोलिस कोमल नागरगोजे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात गोवा बनावटीच्या दारूचे ३० बॉक्स आढळून आले. ही सर्व दारू जप्त करण्यात आली आहे. ही सदनिका अनिल मुंज याने भाड्याने घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुनील पवार करत आहेत.






























































