प्रचारबंदीविरोधात ममतांचे धरणे; चित्र काढत आयोगाच्या कारवाईचा निषेध

निवडणूक प्रचारादरम्यान भावना भडकावणारी विधाने केल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना 24 तासांची प्रचारबंदी केली. या कारवाईविरोधात ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मायो रोड परिसरातील गांधी मूर्ती येथे धरणे आंदोलन केले. यावेळी त्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा पॅनव्हासवर चित्र काढत आयोगाच्या कारवाईचा निषेध केला.

धार्मिक अभिनिवेश असलेली वक्तव्ये केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने 24 तासांसाठी प्रचारबंदी लागू केली आहे. मात्र ही प्रचारबंदी पूर्णपणे घटनाविरोधी असल्याची भूमिका घेत ममता बॅनर्जींनी मंगळवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरू केले. या कालावधीमध्ये त्यांनी कोणतीही राजकीय कृती न करता हातात कॅनव्हास घेऊन पेंटिंग करायला सुरुवात केली. पेंटिंग पूर्ण झाल्यावर उपस्थित नागरिकांनादेखील त्यांनी ते पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले.

ममतांच्या या वक्तव्यांस आयोगाचा आक्षेप

मी माझ्या अल्पसंख्य बंधू आणि भगिनींना हात जोडून विनंती करते की, त्यांनी भाजपकडून पैसे घेऊन बोलणाऱया सैतानाचे ऐकून अल्पसंख्य मतांचे विभाजन होऊ देऊ नका. जर भाजप सत्तेत आली तर तुम्ही गंभीर संकटात सापडाल, असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी 3 एप्रिल रोजी हुगळीमध्ये प्रचारसभेत केले होत. यास आक्षेप घेत निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली होती. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. दहा नोटीस पाठवल्या तरी ते वक्तव्य मागे घेणार नसल्याचे म्हटले आहे.

भाजप नेते राहुल सिन्हा यांना 48 तास प्रचारबंदी

निवडणूक आयोगाने भाजप नेते राहुल सिन्हा यांच्यावर कारवाई केली असून 48 तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली आहे. राहुल सिन्हा यांनी बिहारमधील सीतलकुची येथे चार नाही तर आठ लोकांना ठार करायला हवे होते असे वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर आयोगाने ही कारवाई केली आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना नोटीस पाठवली आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाला तर अशा घटना होत राहतील असे घोष यांनी म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या