
शेतकऱयांच्या रॅलीत उसळलेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. दिल्लीतील हिंसाचाराला पूर्णपणे भाजपच जबाबदार आहे. हे जर बंगालमध्ये घडले असते, तर अमित शहांनी थयथयाट केला असता. ‘अमित भय्या पहले दिल्ली संभाल लो, फिर बंगाल की सोचो’, असा इशाराही ममता बॅनर्जींनी या वेळी दिला.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात गुरुवारी कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावरील चर्चेवेळी ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर तोफ डागली. आम्ही शेतकऱयांसोबत आहोत. कृषी कायदे मागे घेतलेच पाहिजेत. हे कायदे जबरदस्तीने मंजूर केलेले आहेत.
मोदी सरकारने दिल्लीतील हिंसाचाराची परिस्थिती अत्यंत वाईट पद्धतीने हाताळली. जे घडले, त्याला पूर्णपणे भाजपच जबाबदार आहे. हे बंगालमध्ये घडले असते, तर अमित भय्या म्हणाले असते, काय झाले? आम्ही याचा तीव्र निषेध करतो, अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. तसेच तिन्ही कृषी कायदे मागे घ्या, नाहीतर खुर्ची सोडा, असे जाहीर आव्हानही दिले.



























































