
पश्चिम बंगाल घुसखोरांचा अड्डा बनला आहे अशी टीका करणारे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यावर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज जोरदार हल्ला चढवला. ‘‘सगळे घुसखोर बंगालमध्येच असतील, जम्मू-कश्मीरमध्ये एकही दहशतवादी नसेल तर मग पहलगाम हल्ला तुमच्या सरकारने घडवून आणला का? दिल्लीतील बॉम्बस्फोटामागे कोण होते?’’ असा बिनतोड सवाल ममतांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. भाजपने हिंदू-मुस्लिम आणि घुसखोरांचे मुद्दे प्रचारात आणले आहेत. बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी मंगळवारी तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर अनेक आरोप केले. ‘‘राज्यातील घुसखोरी रोखण्यात ममता बॅनर्जींना अपयश आले आहे. सीमेवर कुंपण बनवण्यासाठी ममतांचे सरकार जमीनही देत नाही. 15 वर्षांपासून बंगालचे लोक दहशतीच्या सावटाखाली आहेत. भाजपचे सरकार आल्यास राज्य घुसखोरमुक्त केले जाईल,’’ असे ते म्हणाले.
मोदी-शहा दुर्योधन आणि दुःशासन
बांकुरा येथील प्रचारसभेत ममतांनी शहांच्या आरोपांना उत्तर दिले. मोदी आणि शहांना त्यांनी दुर्योधन आणि दुःशासनाची उपमा दिली. शकुनीचा एक चेला दुःशासन बंगालमध्ये माहिती गोळा करायला आला आहे. निवडणूक आली की दुर्योधन आणि दुःशासन प्रकट होतात. सीमेवर कुंपण घालण्यासाठी बंगाल सरकार जमीन देत नसल्याचे शहा म्हणतात, मग पेट्रोपोल आणि अंडालमध्ये जमीन कोणी दिली, असा सवाल त्यांनी केला. भाजपचे सरकार एसआयआरच्या नावावर छळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.































































