
1987 साली जीपला धडक देत पळून गेल्याचा आरोप असलेल्या विलेपार्ले येथील नागरिकाची दंडाधिकारी न्यायालयाने 38 वर्षांनी निर्दोष मुक्तता केली आहे. तक्रारदार चालकाला ओळखू शकत नाही, असे निरीक्षण दंडाधिकारी न्यायालयाने नोंदवले. नारायण कोटीयन असे त्या चालकाचे नाव आहे. तक्रारदार सेड्रिक डिसिल्वा हे 1987 साली नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत गाडीने फिरायला गेले. सकाळी सहाच्या सुमारास रिगल सिनेमाजवळ अॅम्बेसिडर कारने जीपला धडक दिली. या अपघातात जीप कलंडली. यात एकाचा मृत्यू व नऊ जण जखमी झाले. तक्रारदार दुचाकी चालवत असल्याने त्यांनी अॅम्बेसिडर कारचा क्रमांक नोंदवून घेतला व ते जखमींच्या मदतीला धावले. याप्रकरणी चालक नारायण कोटीयन यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. या प्रकरणात 1992 साली तक्रारदार डिसिल्वा यांची साक्ष नोंदवली. यामध्ये त्यांनी अपघात घडला त्याठिकाणी होतो, मात्र धडक देणाऱया अॅम्बेसिडर कारच्या चालकाला पाहिले नसल्याचे सांगितले. न्यायालयाने याची दखल घेत अखेर कोटीयन यांना 38 वर्षांनंतर निर्दोष मुक्त केले.



























































