चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची नागपुरात नग्न धिंड

1716
प्रातिनिधिक

हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे अवघा देश ढवळून निघाला आहे. देशभरात या प्रकरणामुळे संतापाचं वातावरण असून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. बलात्काऱ्यांबद्दल सामान्यांमध्ये धुमसणाऱ्या रागाचा प्रत्यय नागुपरात आला असून तिथे चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची नग्न धिंड काढण्यात आली आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, नागपूरमध्ये रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. जवाहर वैद्य असं या आरोपीचं नाव असून तो एका सामाजिक सहकारी बँकेत कॅश एजंट म्हणून काम करतो. त्याच्या कामामुळे त्याचं विविध लोकांच्या घरी येणं जाणं होतं. या प्रकरणातील चार वर्षीय पीडितेच्या पालकांनाही तो ओळखत असल्याने त्यांच्या घरी येतजात असे. रविवारी तो पीडितेच्या घरी गेला होता. मात्र, पीडिता घरात एकटीच असल्याचं पाहून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उद्देश साध्य होण्याआधीच पीडितेची आई घरी पोहोचली आणि तिने हा प्रकार पाहून आरडाओरडा करायला सुरुवात केली.

तिचा ओरडा ऐकून शेजारीपाजारी धावले. त्यांनी पळून जायच्या बेतात असलेल्या जवाहरला पकडून त्याची धुलाई केली आणि त्याला विवस्त्र करून परिसरातील रस्त्यावर त्याची धिंड काढली. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी वैद्य याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या