
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
मराठा आरक्षणासाठी एका ४३ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गारखेडा परिसरातील विजयनगरात शुक्रवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. ‘मला फायनान्स कंपनीचे कर्मचारी दोन लाखांच्या वसुलीसाठी तगादा लावत होते, तसेच मी आरक्षणासाठी आत्महत्या करत असून, माझ्यानंतर माझ्या मुलांना आरक्षणाचा लाभ द्यावा’ अशा स्वरूपाची चिठ्ठी पुंडलिकनगर पोलिसांनी जप्त करुन तपासाला सुरुवात केली आहे
गारखेडा परिसरातील विजयनगरात राहणारे कारभारी दादाराव शेळके (४३) हे प्लॅस्टिक मोल्डिंगचे काम करत होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वी श्रीराम फायनान्स कंपनीकडून दोन लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड होत नसल्याने ते नेहमी तणावात राहत होते. गुरुवारी राज्यभरात मराठा आरक्षणासाठी बंद पाळण्यात आला होता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कारभारी शेळके यांनी राहत्या घरी गळफास घेतला. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घटना उघडकीस आली. तात्काळ त्यांना पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शेळके यांना दोन मुले आहेत. पुंडलिकनगर पोलिसांनी घरातून एक चिठ्ठी जप्त केली असून, त्यात त्यांनी ‘मी आत्महत्या करण्याचे कारण मला कोणताही त्रास नव्हता. पण मी मराठा समाजाचा असून मला सरकारचे काहीही फायदे मिळाले नाहीत. मी श्रीराम फायनान्स कंपनीकडून दोन लाखांचे कर्ज घेतले होते. फायनान्सवाले मला त्रास देत असल्याने मी आत्महत्या करीत असून यासाठी कोणालाही जबाबदार ठरवू नये. माझ्या मुलांना आरक्षण देण्यात यावे’, अशा स्वरूपाची चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच मराठा आरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विजयनगर चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून उपनिरीक्षक कापसे यांनी तपासाला सुरुवात केली आहे.



























































