सीपीआरमधुन पळुन गेलेल्या ‘त्या’ कोरोनाबाधीताचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

कोल्हापूरच्या सीपीआरच्या कोरोना कक्षातुन रिक्षाने थेट घरी पळुन गेलेल्या आणि कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या इचलकरंजी शहरातील कुडचे मळा परिसरातील त्या कोरोना बाधीत 55 वर्षीय यंत्रमाग कामगाराचा अखेर आज सकाळी मृत्यू झाला आहे. यामुळे इंचलकरंजी येथील मृत्यूंची संख्या तीन वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 12 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. या कामगारांच्या संपर्कात आल्याने त्यांचा मुलगा आणि नातं तसेच संबंधित रिक्षाचालक यांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर सध्या सीपीआरमध्ये कोरोना कक्षात उपचार सुरू आहेत.

दरम्यान काल रात्री पर्यंत जिल्ह्यात आणखी नवे 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामध्ये इंचलकरंजी येथे 3 नवे रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकुण कोरोना बाधीतांची संख्या 850 वर पोहोचली होती.तर इंचलकरंजी मध्ये आज अखेर एकूण कोरोना बाधीतांची संख्या 40 झाली होती. यातील 6 रुग्ण बरे होऊन घरी परतले असुन, उर्वरित 31 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.तर जिल्ह्यात काल दिवसभरात बरे झालेल्या 5 जणांना घरी सोडण्यात आले.त्यामुळे आतापर्यंत एकूण 720 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आढळल्याने, रात्री सीपीआर मध्ये कोरोना कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला हा यंत्रमाग कामगार दुसऱ्या दिवशी सकाळीच डॉक्टर आणि कर्मचा-यांची नजर चुकवून थेट रिक्षा करून इंचलकरंजी येथे घरी गेला होता. तीन चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता. स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे पळुन आलेल्या या रुग्णांला पुन्हा सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्याचा आज मृत्यू झाला. त्यामुळे सध्या कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या इंचलकरंजी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाकडुन नागरिकांना काळजी घेतल्याचे आवाहन करण्यात आले आहे.