गावातून बहिष्कृत केलेल्या वृद्धाचे पोलीस ठाण्यात विष प्राशन

गावातून बहिष्कृत केल्याच्या कारणास्तव मालवण पोलीस प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी गेलेल्या मालवण येथील विठ्ठल अनंत घाडी या वृद्धाने पोलीस स्थानकाच्या आवारातच विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

आनंदवहाळ घाडी वाडी येथे राहत असलेल्या विठ्ठल घाडी यांनी आपल्याला गावातून बहिष्कृत केल्याचा आरोप करीत याबाबतचा तक्रार अर्ज 1 जून रोजी मालवण पोलीस ठाण्यात दिला. त्यानंतर पुन्हा 6 जुलै रोजी अशाच प्रकारचा तक्रार अर्ज दिला होता. मात्र याबाबत न्याय मिळत नसल्याने त्यांचे म्हणणे होते. गुरुवारी दुपारी विठ्ठल घाडी हे पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपल्याकडे असलेल्या बाटलीतील विषारीद्रव्य प्राशन केले. घाडी हे जमिनीवर कोसळले असतानाच पोलीसांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक बनली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पोलिसांनी गावात चौकशी केली असता त्या व्यक्तीला कोणताही त्रास दिला नसल्याचे ग्रामस्थांनी प्राथमिक चौकशीत स्पष्ट केले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या