हा फक्त हिंदूचाच देश, अशी घोषणा देत तरुणाचा शाहीन बागमध्ये गोळीबार

970

नागरिकत्व कायद्याविरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एका तरुणाने गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी एका तरुणाने शाहीन बाग परिसरात गोळीबार केला. त्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. कपिल गुज्जर असे त्या तरुणाचे नाव असून तो नोयडा जवळील दल्लुपुरा गावातील रहिवासी आहे. या गोळीबारात कुणीही जखमी झालेले नाही. कपिलने गोळीबार करताना हा हिंदूचाच देश आहे, याला हिंदू राष्ट्रच केले पाहिजे अशा घोषणा दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे हा गोळीबार शाहीन बागमधील आंदोलकांवरच होता असे बोलले जात आहे.

 

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि एनआरसीविरोधात मोर्चा काढून आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर एका माथेफिरू तरुणाने गुरुवारी गोळीबार केला. यात एक विद्यार्थी जखमी झाला असून हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे त्या तरुणाने ‘फेसबुक लाइव्ह’ करून पोलिसांसमोर गोळीबार केला. दरम्यान, या घटनेने राजधानी दिल्लीसह देशभरात खळबळ उडाली आहे. राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या