
सामना ऑनलाईन, मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केमिकल हल्ला होणार आहे असे नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या (एनएसजी) नियंत्रण कक्षाला निनावी फोन करून सांगणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी अटक केली. काशीनाथ मंडल असे या तरुणाचे नाव आहे. सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या काशीनाथने नवी दिल्ली येथील एनएसजीच्या नियंत्रण कक्षाचा संपर्प नंबर मिळवून त्यांना फोन करून पंतप्रधान मोदींवर हल्ला होणार असल्याचे सांगितले. मग डी. बी. मार्ग पोलिसांनी लगेच शोधमोहीम हाती घेतली. काशीनाथ मंडल सुरतची ट्रेन पकडण्यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काशीनाथला पकडले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो म्हणाला की, झारखंड येथे काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्याच्या मित्राची हत्या झाली. याच संदर्भात मला मोदींना भेटायचे होते असे त्याने सांगितले.
























































